पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाजपने 'अब की बार 400 पार' ही घोषणा देशाचे संविधान बदलण्यासाठीच दिली आहे. भाजप एकीकडे सांगते की, संविधान बदलणार नाही व आरक्षण रद्द करणार नाही, परंतु दुसर्या बाजूला मोदी सर्व प्रकारची गॅरंटी देत आहेत. पण, त्यांच्या जाहीरनाम्यात संविधानाची गॅरंटी नाही. त्यामुळेच त्यांचा डाव संविधान बदलण्याचा दिसत आहे, असा दावा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता राऊत पुण्यात आले आहेत. ते म्हणाले की, देशात सर्वत्र भाजपच्या विरोधात जनतेमध्ये अंडर करंट दिसून येत आहे. पहिल्या तीन टप्प्यांच्या मतदानात भाजपविरोधी वातावरण स्पष्टपणे जाणवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्ये पाहता त्यांना पराजित होण्याची मोठी चिंता दिसत आहे. पुण्यामध्येही काँग्रेसच्या बाजूने वातावरण आहे. भाजप आणि मोदीविरोधातील लोकांमध्ये असलेला राग मतदानातून बाहेर पडलेला दिसेल. पुण्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग काँग्रेसने राबविला असून, पुण्यात पहिल्यांदा ओबीसी उमेदवार दिला आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करणारा उमेदवार दिल्याने काँग्रेसला पुण्यामध्ये सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर चालणारे हे शहर असून, पुणेकर सूज्ञपणे निर्णय घेतील, असे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा