पुणे

Loksabha election | शिवतारेंचे ‘तारे जमीन पर’ : सुषमा अंधारे यांची टीका

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ज्या पध्दतीने 'यू टर्न' घेतला आहे, स्क्रिप्ट रायटरने क्लायमेक्स काय असावा, हे आधीच लिहून ठेवले होते. क्लायमेक्सचा कागद शिवतारे यांच्या हातात मिळाल्यामुळे त्यांनी घेतलेला 'यू टर्न' हा त्यांच्या स्क्रिप्ट रायटरला साजेसाच आहे. त्यात आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. त्यांचा 'यू टर्न' म्हणजे 'तारे जमीन पर' अशातला प्रकार असल्याची टीका शिवसेनेच्या उपनेत्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सुषमा अंधारे यांनी केली. शिवतारे यांची स्क्रिप्ट कोण लिहून देत आहे, हे शोधताना अजित पवार यांनी त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना एकदा बघून घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

डेक्कन परिसरातील शिवसेना भवन येथे आल्या असता त्या माध्यमांशी बोलत होत्या. संजय राऊत यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला असून, अकोल्यातून त्यांनी आपल्याला पाडण्याचा कट रचला, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलखत आहेत. वंचित बहुजन आघाडी यांना कायम चर्चेला बोलाविण्यात आले. मात्र, ते कायम तिसर्‍या व चौथ्या फळीतील लोकांना पाठवत होते. मुंबईला जी सभा झाली तिथे वंचितने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिले नाही? काँग्रेसशी पटत नाही; पण त्यांना तुम्ही बोलावले. आम्ही आधी 4, नंतर 5 जागा दिल्या होत्या. आम्ही 100 पावले चाललो, तुम्ही आहे त्या जागेवर तरी थांबा. तुम्ही मागे जात असाल तर ही कसली दोस्ती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही, हे फक्त जाणूनबुजून दाखविले जात आहे. छोटे-मोठे वाद होतात, ते मिटतील. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद न्यायालयात सुरू आहे. मात्र, तरीही भाजप त्यांना उमेदवारी देते. भाजप बिथरलेली असून, न्यायाला विसंगत वागत आहे. ज्या अजिदादांनी आढळरावांवर टीका केली त्यांच्याकडेच आढळराव पुन्हा गेले. स्मृती इराणी, कंगना राणावत, नवनीत राणा हे चित्रपट क्षेत्रातून आले आहेत. त्यामुळे व्यवसायावरून कोणी कोणावर टीका करू नये. सांगलीसाठी काँग्रेस इच्छुक आहे, हे सर्वश्रुत आहे. पण, अकोला आणि रामटेकची जागा काँग्रेसला गेल्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेकडे आल्याचे अंधारे यांनी बोलताना सांगितले.

ठाण्यात आमचाच विजय

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी ठाणे मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करावा. ठाण्याची जागा आम्हीच निवडून आणू. ठाण्यात विजय हा आमचाच असेल, असेही अंधारे यांनी ठामपणे नमूद केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT