पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघासह शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी आज सोमवारी (दि. 13) मतदान होत आहे. या हाय व्होल्टेज लढतीचा फैसला आज मतदानयंत्रात बंद होईल. यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी विधानसभा मतदारसंघनिहाय साहित्याचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. पुणे लोकसभेअंतर्गत वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ, अशा सहा ठिकाणांहून रविवारी सकाळी मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
मतदान कर्मचार्यांना या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील साहित्य वितरण स्व. राजाराम भिकू पठारे स्टेडियम (खराडी) मध्ये करण्यात आले. 453 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट आणि एक हजार 359 बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले. शिवाजीनगर मतदारसंघासाठी बॅडमिंटन हॉल, कृषी महाविद्यालयात साहित्य वितरण करण्यात आले. साहित्य वाटपासाठी नेमणूक केलेल्या कर्मचार्यांनी 28 टेबलद्वारे नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचार्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आलेली 840 बॅलेट युनिट व 280 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे वितरण केले.
कोथरूड मतदारसंघासाठी पौड रोडमधील विश्वशांती गुरुकुल विद्यालय, एमआयटी संस्था येथे 1 हजार 191 बॅलेट युनिट, 397 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट वितरित करण्यात आले. पर्वती मतदारसंघासाठी शेठ दगडूराम कटारिया महाविद्यालय, महर्षिनगरमधून पर्वती मतदारसंघात 1 हजार 32 बॅलेट युनिट, 344 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंटसाठी अल्पबचत भवनमधून 227 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट आणि 822 बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले. कसबा पेठ मतदारसंघासाठी गणेश कला क्रीडा मंचमधून 810 बॅलेट युनिट, 270 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले
पुणे लोकसभेसाठी 2 हजार 18 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, सर्व मतदान केंद्रांवर किमान आश्वासित सुविधा, औषधोपचार किट, शारीरिक विकलांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मदत करण्यासाठी तसेच केंद्रावरील रांगांच्या व्यवस्थापनात साहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक, ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत येण्यास सक्षम नसलेल्या मतदारांनी मागणी केल्यास घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आणण्याची व्यवस्था केली आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदानाचा हक्क बजावावा.
– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी
पिंपरी : जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण 25 लाख 85 हजार 18 मतदार आहेत. तर, 2 हजार 566 मतदार केंद्रे आहेत. रिंगणात एकूण 33 उमेदवार असल्यामुळे तीन बॅलेट युनिटचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत सर्व मतदार केंद्रे सज्ज झाली असून, मतदानासाठी एकूण 12 हजार अधिकारी व कर्मचारी नेमले आहे. मतदानासाठी त्यासाठी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, 50 टक्के केंद्रात वेब कास्टींग केले जाणार आहे.
दरम्यान, याच मतदारसंघात येणार्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व 468 मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज असून या विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 51 हजार 582 मतदार आहेत. पुरूष मतदार 3 लाख 2 हजार 75, महिला मतदार 2 लाख 51 हजार 582 आणि तृतीयपंथी मतदार 91 आहेत. एकूण 468 मतदान केंद्रे आहेत. मतदान कामकाजासाठी 2 हजार 774 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात दिव्यांग, महिला, तरूण व नवीन संकल्पनेवर आधारित प्रत्येक एक मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेवनाथ लबडे यांनी दिली.
उरुळी कांचन : शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी होणार्या मतदानासाठी रविवारी पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रांवर पोहोचेल याची आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारसंघात 25 लाख 39 हजार 702 मतदार असून ते 2509 मतदान केेंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
हेही वाचा