पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन मी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत आहे" अशी प्रतिक्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, सुषमा अंधारे, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे पवार साहेब व त्यांच्यावर प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला. जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे.
हेही वाचा