महाराष्ट्रात वंचित आणि भाजपमध्येच लढाई : प्रकाश आंबेडकर | पुढारी

महाराष्ट्रात वंचित आणि भाजपमध्येच लढाई : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले असून काँग्रेसचे नेते उघडपणे बंड करीत आहेत. तर महायुतीत जागावाटपावरून संघर्ष सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रातील सद्याची राजकीय परिस्थिती पाहता फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यातच लढाई आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर या पाच मतदारसंघात शुक्रवारी, 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमिवर प्रकाश आंबेडकर यांनी ’एक्स’ या समाजमाध्यमावर पत्र जारी करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. कार्यकर्त्यांच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आणि आपले स्वप्न साकार करण्याची एक संधी दिली आहे. हे केवळ आपले स्वप्न नाही तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे, ते भैय्यासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. त्यामळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत, असे आवाहन त्यांनी केले.

खोट्या बातम्या वाचून संयम गमावू नका!

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणार्‍या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्यांचा सत्याने सामना करा आणि तुमचा संयम गमावू नका, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले. खरे तर त्यांना वंचितची आणि वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटते या गोष्टीचा तुम्हाला आनंद आणि गर्व वाटला पाहिजे.

आपण पराक्रमी नसतो, तर त्यांनी लुटलेला पैसा आणि वेळ आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात खर्च केला असता का? असा सवाल करत खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हे दर्शवते. वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल म्हणून ते घाबरत असल्याचे वास्तव आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

Back to top button