पुणे

Loksabha election 2024 | निवडणुकीच्या तोंडावर ‘करसुधारणा’ रखडली !

Laxman Dhenge

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चुकीच्या मिळकतकरात सुधारणा न झाल्याने 34 गावांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो रहिवाशांवर भरमसाट मिळकतकराची टांगती तलवार कायम असून, शासनाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेने योग्य पध्दतीने करआकारणी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय हवेली तालुका नागरी कृती समितीने केली आहे. चुकीच्या कराविरोधात आंदोलने, मोर्चे काढण्यात आले होते. याची दखल घेत शासनाने योग्य पध्दतीने करआकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्यापही महापालिका प्रशासनाने सुधारित करआकारणी केली नसल्याचे कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले.

कृती समितीचे उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर म्हणाले, 'भरमसाट करामुळे कंपन्या बंद पडून रोजगार बुडणार आहे. नागरिकांवर मालमत्ता विकण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करूनही पालिकेकडून दखल घेतली जात नाही.' आंबेगाव खुर्दचे माजी सरपंच अमर चिंधे म्हणाले, 'विकासाला चालना मिळावी म्हणून 34 गावांचा समावेश केला. मात्र, आता भरमसाट करवसुलीमुळे महापालिका नको, अशी म्हणण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.'

अन्यायकारक करवाढ रद्द करावी, पिंपरी-चिंचवड व डोंबिवली महापालिकेच्या धर्तीवर समाविष्ट गावांना सवलत द्यावी आणि अन्यायकारक कर रद्द करावा. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरू झाली नाही.

– श्रीरंग चव्हाण, अध्यक्ष, हवेली तालुका नागरी कृती समिती

हेही वाचा

हेही वाचा

SCROLL FOR NEXT