पुणे

LokSabha Elections ! हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है : कोल्हे

Laxman Dhenge

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना आढळराव पाटील यांनी संसदेत स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयीच प्रश्न विचारले होते, असा आरोप केला होता. यानंतर आता अमोल कोल्हे यांनी थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांना कोंडीत पकडत, हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असे सुनावले आहे.

ओतूरच्या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर 'हे तर लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी', असा थेट आरोप केला होता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुरावे द्या, नाहीतर निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घ्या, असे आव्हान दिले होते. डॉ. कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारल्याचे सांगत, शब्द फिरवत माघार घ्यायची नाही, असे प्रतिआव्हान आढळराव पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी पुरावे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केलाय. डॉ. कोल्हेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

आढळराव पाटलांनी लोकसभेत 7 एप्रिल 2017 आणि 13 फेब्रुवारी 2019 रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे अमोल कोल्हे यांनी दाखवली आहेत. आढळराव पाटलांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला, असा आरोप करत याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं, शिवाय मी पुरावे दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडणार, हा दिलेला शब्द आता आढळरावांनी पूर्ण करावा, असे प्रतिआव्हानही अमोल कोल्हेंनी दिले आहे. 'हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है' असे म्हणत 17 मार्च 2017, 9 डिसेंबर 2016 आणि 26 डिसेंबर 2018 या तारखांना कंपनीच्या हितासाठी मांडलेल्या प्रश्नांची आठवण करून दिली. सोबत कागदपत्रांचा गठ्ठा दाखवत हे सगळे पुरावे टप्याटप्याने जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देत, कोल्हे यांनी आढळरावांचं टेन्शन वाढवलं आहे.

शिरूरसारख्या ग्रामीण मतदारसंघातल्या तत्कालीन खासदार आढळराव पाटलांनी संरक्षण विभागाला डिफेन्स पार्ट्स पुरवणार्‍या कंपनीचे प्रश्न विचारल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. आता आढळराव पाटील कसा 'डिफेन्स' करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावा-खेड्यातले, शेतीमातीचे प्रश्न सोडून आढळराव भलतेच प्रश्न लोकसभेत मांडत असताना आढळून आल्याने संशयाचे मळभ आणखीन गडद होतेय, असेही कोल्हे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT