पुणे

LokSabha Elections | दोन्ही पवारांना पाणीटंचाई भोवणार; दुष्काळ निवारणाकडे पूर्ण दुर्लक्ष

Laxman Dhenge

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार घराण्यातील दोन्ही उमेदवार प्रचारदौरे करत असताना त्यांना सध्याच्या तीव्र दुष्काळी स्थितीमध्ये पाणीटंचाईच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागणार आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रदीर्घ काळ दोन्ही पवार करत असल्यामुळे त्यांना हा प्रश्न टोलवता येणे शक्य होणार नाही. शरद पवार यांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पाण्याच्या प्रमुख प्रश्नावर मतदारांचे कसे समाधान करणार यावर निवडणुकीची बरीच गणिते अवलंबून आहेत. बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शरद पवार आणि अजित पवार यांनी राज्य, केंद्र सरकारमध्ये अनेक मोठी पदे भूषविली असून अजित पवार तर आजही उपमुख्यमंत्री आहेत, परंतु बारामती मतदारसंघातील पाणी टंचाईग्रस्त भागाची तहान भागविण्याचे काम काही दोन्ही पवारांच्या हातून झालेले नाही.

आजही अनेक ठिकाणी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. वर्षानुवर्षे हे सुरू आहे, आता ऐन निवडणुकीत नेहमीच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईऐवजी तीव्र दुष्काळी स्थिती त्यांच्यासमोर आली आहे. या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात काही विशिष्ट भाग वर्षानुवर्ष पाण्यापासून वंचित आहे, त्यासाठी काही ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. पुरंदर हा मोठे राजकीय आव्हान उभे असलेला तालुका राज्यसरकारने दुष्काळी जाहीर केला, पण यानंतर दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर पूर्ण दुर्लक्ष केले आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सासवड आणि जेजुरीसारख्या मुख्य शहरातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

सासवडकरांना पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे, तर तीर्थक्षेत्र जेजुरी येथील मल्हार जलासागरात पाणीच नसल्याने जेजुरीसह बारामतीमधील 17 गावांचा पाणीपुरवठा अडचणीत आला आहे. जेजुरीतील लोकांना 10 ते 11 दिवसानंतर पाणी मिळत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्रस्त जनतेने दिला आहे. या तालुक्यातील पुरंदर उपसा योजना रडतखडत सुरू आहे, तर गुंजवणी प्रकल्प निधी आणि राजकारणापाई रखडला आहे. पवारांच्या बारामती तालुक्याच्या जिरायती भागात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र आहेत. एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाने चाळिशी गाठली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. सद्य:स्थितीत नऊ गावांना दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तीर्थक्षेत्र मोरगाव व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

दौंड तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे पडले आहेत. सर्व तलाव कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याचे पाणी आणि वन्यजीवांना मिळणारे पाणी दुर्लभ होऊ लागले आहे. वन्यप्राण्यांचा उष्णता आणि पाण्याअभावी मृत्यू होण्याची शक्यता आता वाढू लागली आहे. इंदापूर तालुक्या तर भयावह स्थिती आहे. उजनी धरण मायनस 40 टक्के असून, भीमा नदीचे पाणीदेखील झपाट्याने कमी होऊ लागले आहे. भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. निरा नदीदेखील काही गावात कोरडीठाक पडली असून त्यावरील बुडीत बंधारे उघडे पडले आहेत. त्या भागातदेखील आता लवकरच टँकरची मागणी होणार आहे. भोर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त 7 गावांतील टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागास प्राप्त झाले. यामध्ये पर्‍हर बुद्रुक, राजीवडी, शिळिंब, उब्रंरडेवाडी, नानावळे, कंरदी खे. बा., पुणे बोगद्याजवळील शिंदेवाडी या गावांनी टँकरची मागणी केली आहे.

जलजीवन मिशनचे काय करणार?

जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून काही गावांत सुरू केलेली कामे, त्यातील प्रचंड भ्रष्टाचारामुळे एकतर बंद पडली आहेत किंवा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबद्दल तक्रारी झाल्यानंतरही त्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. पाण्याची टंचाई हा मोठा मुद्दा या निवडणुकीत अचानक दोन्ही उमेदवारांसमोर येऊ शकतो.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT