Drug Pudhari
पुणे

Pune Drug Bust: लोणी काळभोरमध्ये पानटपरीतून अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश; दुकानदार अटकेत

‘नशेली पान’च्या नावाखाली मेफेड्रॉन विक्री सुरू असल्याचे उघड; पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला

पुढारी वृत्तसेवा

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील आष्टापूर फाटा परिसरात पानटपरीच्या आडून सुरू असलेला अमली पदार्थ विक्रीचा प्रकार लोणीकंद पोलिसांनी उघडकीस आणला. येथील ‌‘मल्हार पान हाऊस‌’ या दुकानात ‌‘नशेली पान‌’च्या नावाखाली अमली पदार्थ विक्री होत होती.

या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून दुकानचालकाला अटक केली. या कारवाईत 796 ग््रॉम ‌‘मेफेड्रॉन‌’ (एमडी) मिश्रित अमली पदार्थ तसेच मोबाईल, असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी रोहित त्रिंबक आंबेकर (वय 26, रा. नायगाव, ता. हवेली) या दुकानचालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार स्वप्निल जाधव यांना बातमीदारामार्फत या दुकानात ड्रग विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने फॉरेन्सिक टीमसह छापा टाकण्यात आला. दुकानाची पंचांसमक्ष झडती घेतली असता काउंटरमधील ड्रॉवरमध्ये सिल्व्हर पिशवीत ठेवलेली पिवळ्या रंगाची संशयास्पद भुकटी आढळून आली.

चौकशीत आरोपीने ‌‘ॲम्फेटामाइन‌’ आणि ‌‘मेथॅम्फेटामाइन‌’ ही घातक पावडर पानात मिसळून ग््रााहकांना विक्री करत असल्याची कबुली दिली. फॉरेन्सिक तपासणीमध्येही ही बाब स्पष्ट झाली असून, ‌‘पाना‌’च्या नावाखाली थेट अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या कारवाईत 80 हजार रुपये किमतीची अमली भुकटी आणि 50 हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीकडे हे अमली पदार्थ कुठून आले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहेत, याचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक बेंदगुडे करीत आहेत. या घटनेमुळे पानटपऱ्यांच्या आडून सुरू असलेल्या अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा ठिकाणी आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT