खेड : खेड तालुक्यातील विशेष आर्थिक विकास क्षेत्र अर्थात खेड सिटी परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी नाकारल्या जात असल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. स्थानिक तरुण रोजगारासाठी कंपन्यांच्या दारोदारी भटकत असून, बाहेरून येणाऱ्या कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. यामुळे परिसरात सामाजिक तणाव वाढत असून, गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.
स्थानिक युवकांचे म्हणणे आहे की, कमी शिक्षण किंवा अर्धवट शिक्षण असले तरी त्यांना स्थानिक उद्योगांमध्ये काम मिळायला हवे. मात्र, कंपन्या त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक युवक निराशेच्या गर्तेत लोटले जात आहेत. यातूनच काही युवक गुन्हेगारी आणि दहशतीच्या मार्गाकडे वळत असून टोळ्यांच्या माध्यमातून असे काम मिळवण्यासाठी वाम मार्गाने जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये खेड सिटी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असून, याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जाणकारांचे मत आहे की, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे कौशल्यविकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.
“जर स्थानिकांना रोजगार मिळाला नाही, तर सामाजिक शांतता धोक्यात येईल. पंढरपूरच्या वारकरी संस्कृतीचा वारसा असलेला हा परिसर गुन्हेगारीच्या छायेत येण्याची भीती आहे.”संतोष गोरडे, खेड तालुका खरेदी विक्री संघ संचालक, माजी सरपंच ग्रामपंचायत गोसासी