पुणे: न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागांत पाऊस जास्त असेल त्या भागांतील निवडणुका थोड्या पुढे ढकलण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला करू. पण, वेळेत निवडणुका पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याचे संकेत देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 120 दिवसांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील माहिती दिली. (Latest Pune News)
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही हा निर्णय घेतला की, मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधारणा झाल्या पाहिजेत. ई-गव्हर्नन्सचा वापर वाढला पाहिजे. तसेच प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे, या दृष्टीने विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आम्ही करत आहोत. या पूर्वी जिल्हाधिकार्यांसोबत कार्यशाळा झाली. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्यासोबत कार्यशाळा घेतली.
आज राज्यातील मोठ्या महानगरपालिकांचे आयुक्त आणि नगरपरिषदांचे सीईओ यांची कार्यशाळा आहे. त्यांच्यासोबत देखील संवाद केला आहे. त्यांचे गट तयार केले असून त्यांच्याशी चर्चा करून पुढचा अजेंडा ठरवतो.
दीडशे दिवसांचा अवधी ठेवला आहे. अनेक लोक चांगले काम करत आहेत. ते जोपर्यंत पदावर असतात, तोवर ते काम राहते, ते बदलल्यानंतर व नवीन कोणी आल्यावर त्यात बदल होतो. असे न होण्यासाठी संस्थात्मक बांधणी करायची आहे, त्यासाठी या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. यानंतरही कार्यशाळा होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
पुण्यातील व्यापार्यांच्या पाठीशी
पुण्यातील फळांचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी तुर्कस्तानच्या फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. इथून पुढे तुर्कस्तानमधून कुठलेही फळ मागवणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती.
त्यानंतर आता व्यापारी सुयोग झेंडे यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन कॉल आले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता, व्यापार्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे म्हणत फडणवीस यांनी व्यापार्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
लॉरेन्स बिष्णोईप्रकरणी पडळकर यांना तक्रार देण्यास सांगितले
नाशिक येथील रॅलीत लॉरेन्स बिष्णोईचे पोस्टर दाखवण्यात आले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ज्यांनी पोस्टर दाखवले त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. याबाबत मी गोपीचंद पडळकर यांना स्वतः तक्रार करायला सांगितल आहे, असे फडणवीस म्हणाले.
‘मराठा आरक्षणप्रश्नी भक्कमपणे बाजू मांडू’
मराठा आरक्षण प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी स्वतंत्र खंडपीठाचा निर्णय आम्ही ऐकला आहे. खंडपीठ स्थापन झाल्यावर आम्ही सरकार म्हणून भक्कमपणे भूमिका मांडू, असे फडणवीस म्हणाले.