सुनील माळी
पहाटेच्या पाचच्या ठोक्याला भाऊ उठतात...
रात्री अडीच-तीनला झोपल्यानं अवघी दोनच तास झोप झालेली असते, त्यामुळं शरीर थोडं आळसावलेलं असतं..., पण आळस झटकून ते उठतात... अवघ्या अर्ध्या तासात फेश होऊन आणि लॉण्ड्रीतनं आलेला झब्बा-पायजमा घालून ते पहिल्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर असलेल्या आपल्या ऑफिसात येतात..., पण कार्यकर्त्यांचा अजून पत्ताच नसतो. घाईघाईनं ते मोबाईलची बटणं दाबतात...
“अरे सद्या, कुठंय ?”
“आलोच भाऊ, गाडीवरच हाये.”
चार-पाच मिनिटांत दोन टूव्हीलर अंगणात येतात. वरनं आलेले चहाचे प्लॅस्टिकचे पेले ते एका दमात रिचवतात अन् गाड्या भरधाव वेगानं प्रभागातल्या बागेकडे निघतात... पहाटेचा अंधार अजून दूर झालेला नसतो, तरी बागेत अनेक मंडळींनी व्यायामाला सुरुवातही केलेली असते.
“लेकाचे, पहाटेपासनंच कसं येतात, कोण जाणे ?...”
भाऊ पुटपुटतात. पुढं होत हात जोडल्याची नेहमीची पोझ घेतात अन् ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर आणतात.
“नमस्कार, काका... मी उभायं यंदा...”,
“हो, हो... तुमचं नाव वाचलं पेपरात. पार्टी बदलली की काय तुम्ही ?”
“अहो काका, आमच्या पार्टीनं आम्हाला ऐनवेळी दगा दिला. अण्णा अन् दादा म्हणले होते ‘तुझं तिकीट पक्कं, काम सुरू कर...’ मी त्या दोघांचे फोटो लावून पोस्टर तयार केली, काही ठिकाणी ती लावलीही. पण, कसलं काय अन् कसलं काय? अहो, कँडिडेट्सची लिस्टही डिक्लेअर नाही केली पार्टीनं..., सर्वांना फॉर्म भरायला लावला अन् शेवटच्या तासात कुणाला एबी फॉर्म दिला, ते कळलंही नाही.”
“मग या दुसऱ्या पार्टीचं तिकीट ऐनवेळी कसं मिळालं बुवा..?”
“हाहाहा, त्यालाच तर भाऊ म्हणतात. त्या शेवटच्या तासात अशी गाडी घुमावली अन् गाठला थेट विद्यापीठ चौक अन् गेलो बंगल्यावर..., लगोलग एबी मिळवलं अन् शेवटच्या मिन्टाला फॉर्म भरला इलेक्शन ऑफिसात...”
“वा...वा..., एवढी जबरी लढत दिलीयं तुम्ही तिकिटाला, मग तुम्हालाच आमचं मत, भाऊ आगे बढो...”
“थँक्यू... थँक्यू...”
भाऊ पुढं सरकतात अन् बागेत फेऱ्या मारणाऱ्यांपुढं कंबरेत लवून नमस्कार करू लागतात. मागं पोरं ओळखपत्र अन् भाऊंचा वचननामा वाटत असतात... थोड्या वेळानं भाऊ अलगद बागेबाहेर येतात, तोच फोनची रिंग वाजते.
“हॅलो भाऊ, पदयात्रा खोळंबलीये, लगेच पोहोचा ---- चौकात.”
“आलोच मी...”
स्कूटरवरून वेगानं निघतात. चौकात कार्यकर्त्यांनी तासापासनं फिल्डिंग लावलेली असते. पलीकडल्या वस्तीतल्या बायाबापड्यांना जमा करताकरता त्यांचा जीव मेटाकुटीला आलेला असतो.
“चार तास झेंडे घिऊन चालायचं अन् वर घोषनाबी द्यायच्या..., किती देनार?” एका बापडीचा रोखठोक प्रश्न. शेवटी त्यांचं समाधान करण्यात कार्यकर्ता यशस्वी होतो अन् ती टोळी चौकाकडे सरकते.
भाऊ चौकात आल्या आल्या घोषणा सुरू होतात. एक जण आवाज देतो... “येणार कोण...?”, समोरचे ओरडतात भाऊंशिवाय आहेच कोण?”...
हजार फटाक्यांची लड फुटायला लागते अन् पदयात्रा सुरू होते.
...पदयात्रा मेन रोड सोडते अन् वस्तीत शिरते... मग वस्तीतले कार्यकर्ते पुढं होतात...
“वहिनी, आपले उमेदवार आलेत...”
वहिनी तबक घेऊन बाहेर येतात. औक्षण होतं. “नमस्कार ताई, आपलं चिन्ह विसरायचं नाही, घरातल्या सगळ्यांना सांगा...”
कपाळी गंध लावलं जातं अन् ही वरात पुढं सरकते.
“भाऊ, गेल्या वेळंला या बूथवर आपल्याला सातशेचा लीड होता. काळजी करू नका...”
स्थानिक कार्यकर्ता भाऊंना आश्वस्त करतो. तोच एका घरातनं एक मावशी बाहेर येते अन् तावातावानं म्हणते,
“ओ भाऊ, अवं पाणीच नाही पुरत नळाचं. येतं ते अगदी करंगळीएवढं अन् तेही एकच तास... तुमी काय करणार?”
सगळ्या नजरा आता भाऊंवर असतात.
“ताई, ताई, बरोबरच आहे तुमचं..., पण बघा, गेल्या इलेक्शनला माझा प्रभाग वेगळा होता. इथनं मी पहिल्यांदाच लढतोय... मला एकदा निवडून द्या, मग बघा एका महिन्यात नळाला कसं फोर्सनं पाणी येतंय ते?”
“बगू... बगू देताय का तुम्ही पाणी?”
मावशी नरमते.
वस्तीतून बाहेर निघेपर्यंत भाऊंचा चेहरा गंधामुळं शेंदऱ्या मारुतीसारखा लालेलाल झालेला असतो. आता उन्हंही चढलेलं असतं.
“चार तासांचीच बोली होती...”
पदयात्रेतल्या बाया (बापड्या) करदावू लागतात.
“हो, हो..., थांबू आता, या शेवटच्याच बिल्डिंगा”
कार्यकर्ता समजूत काढतो खरा, पण चार तास उन्हात चालल्यानं त्यालाही आता थांबावंसं वाटत असतं.
थोडा वेळ जातो अन् कार्यकर्ताच भाऊंना म्हणतो,
“भाऊ, आता इथं आपल्या पदयात्रेचा शेवट करू.”
सगळा रागरंग बघत भाऊ मान हलवतो अन् जेवायची सुट्टी होते.
भाऊ घर गाठतात, जेवण करतात अन् आरामखुर्चीवर थोडं विसावतात खरे, पण मोबाईलवर आलेले मेसेज पाहायचं काम मात्र चालूच राहतं. कार्यकर्ते ठीक चार वाजता हजर होतात अन् आता सुरू होणार असलेल्या सायकल रॅलीच्या प्लॅनिंगची माहिती भाऊंना देतात, तसंच त्याकरता पोरं जमवताना कायकाय करावं लागलं? किती द्यावे लागले? याचाही तपशील पुरवतात.
सायकल रॅली प्रभागभर फिरते अन् घोषणांनी भाग दुमदुमून जातो...
मध्येच भाऊंचा फोन वाजतो. ते नाव बघतात आणि कडेला जाऊन दबक्या आवाजात बोलत राहतात “अरे, सेटल करून टाक, ठरवून तूच देऊन टाक, किती म्हणतोय ते बघ, पण परिणाम झाला पाहिजे चांगला म्हणावं, सगळीकडे तूच पोचव कॉप्या म्हणा..., पण गाडीतून जाताना जरा काळजी घे, ते इलेक्शन ड्युटीवाले गाड्या अडवून तपासणी करताहेत..., उगाच सापडलास तर प्रॉब्लेम यायचा...”
एवढ्यात बाजूचा कार्यकर्ता पुढे येतो.
“भाऊ, त्या जयदीप सोसायटीत जायचंय..., 96 फ्लॅट्स आहेत तिथं.”
सोसायटीची मीटिंग चालू होते...
“भाऊ, आमच्या सोसायटीत शाण्णव फ्लॅट आहेत, मीनिमम साडेतीनशे व्होट्स आहेत आमची... आमचा पाठिंबा तुमालाच आणि मतंही तुमालाच, पण भाऊ सोसायटी आता जुनी झालीये, कलर तेवढा मारून द्या ना चांगला...
सोसायटीचे चेअरमन पहिल्याच फेरीत रोखठोक सांगून टाकतात.
“करू ना..., त्यात काय एवढं...?, पण तुमच्या बूथमधनं हंड्रेड परसेंट मिळाली पाहिजेत हां मतं... काय?
“नक्की भाऊ...”
मग विकासाची गंगा आपल्या प्रभागात आपण कशी आणणार? यावर भाऊंचं पंधरा मिनिटं रसाळ भाषण होतं... चहा होतो अन् मीटिंग संपते...
रात्रीचे नऊ वाजलेले असतात.
“भाऊ, त्या --- आळीच्या गणपती मंडळाची पोरं वाट पाहताहेत..., त्यांना बाप्पाच्या चांदीच्या दागिन्यांचं सांगायचंय ना?”
“हो..., हो... चला, ती पोरं शेवटच्या दिवशी लागणारेत आपल्याला...”
भाऊंची गाडी आधी अन् नंतर कार्यकर्त्यांच्या गाड्या गणपती बाप्पाच्या दिशेने सुटतात... ती मीटिंग सक्सेसफुल होते तेव्हा मध्यरात्र जवळ येऊ लागलेली असते.
--- गार्डनच्या कट्ट्यावर भाऊ कार्यकर्त्यांसह विसावतात आणि समोर आलेल्या पावभाजीचा आस्वाद घेऊ लागतात. चर्चा सुरू होते ती दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या प्रचाराची...