पुणे

खिशाला वीजेचा भार; राज्यात आजपासून होणार नवे वीज दर लागू

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात आजपासून (दि. 1 एप्रिल) नवीन वीज दर लागू होणार आहेत. त्यानुसार महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे. त्यातच इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे 10 टक्के दरवाढ होईल, असा अंदाज आहे. वीज नियामक आयोगाच्या मार्च 2023 रोजीच्या आदेशानुसार ही दरवाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मार्च 2023 मध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यांत वीज दरवाढ मंजूर करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ही वीज दरवाढ होत आहे. दरम्यान, एक एप्रिल 2023 च्या तुलनेत एक एप्रिल 2024 पासून सर्वच संवर्गांतील ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे.

घरगुती संवर्गातील सिंगल फेजसाठी पूर्वी 116 रुपये लागायचे. आता 1 एप्रिल 2024 पासून 128 रुपये लागतील. थ्री फेजसाठी
पूर्वीच्या 385 रुपयांऐवजी 425 रुपये लागणार आहेत. वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या 470 रुपयांऐवजी 517 रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ग्राहकांना शून्य ते 20 किलोवॅटसाठी पूर्वीच्या 117 रुपयांऐवजी 129 रुपये, 20 ते 40 किलोवॅटच्या ग्राहकाला 142 रुपयांऐवजी 156 रुपये, 40 किलोवॅटवरील ग्राहकाला पूर्वीच्या 176 रुपयांऐवजी 194 रुपये स्थिर आकार लागेल.

कृषी ग्राहकांना (मीटर नसलले) 5 हॉर्सपॉवरपर्यंत पूर्वीच्या 466 रुपयांऐवजी 563 रुपये, लघू औद्योगिक ग्राहकांना 20 किलोवॅटपर्यंत 530 रुपयांऐवजी 583 रुपये स्थिर आकार लागेल. पथदिव्यांसाठी पूर्वीच्या 129 रुपयांऐवजी आता 142 रुपये, सरकारी कार्यालये व रुग्णालयांना 20 किलोवॅटपर्यंत पूर्वीच्या 388 रुपयांऐवजी आता 427 रुपये स्थिर आकार पडणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT