यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; सह्याद्री रुग्णालयावर वैद्यकीय हलगर्जीपणाचा नातेवाइकांचा आरोप Pudhari
पुणे

Sahyadri Hospital: यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; पुण्यातील सह्याद्री रुग्णालयावर गंभीर आरोप

नातेवाइकांनी रुग्णालयामध्ये वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: यकृत प्रत्यारोपणासाठी पतीला वाचवण्यासाठी जिवाचा धोका पत्करलेल्या 42 वर्षीय कमिनी कोमकर यांचा आणि त्यांचे पती बापू कोमकर (49) यांचा सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या पतीला वाचवण्यासाठी निरोगी असलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याने कोमकर कुटुंब दु:खसागरात बुडाले आहे. नातेवाइकांनी रुग्णालयामध्ये वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे.

हडपसर येथील कोमकर कुटुंबावर दुहेरी शोककळा कोसळली आहे. 15 ऑगस्ट रोजी सह्याद्री रुग्णालयात बापू बाळकृष्ण कोमकर यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना वाचवण्यासाठी पत्नी कमिनी कोमकर यांनी स्वेच्छेने यकृतदान केले. (Latest Pune News)

परंतु, काही तासांतच बापू कोमकर यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर सहा दिवसांनी दात्या म्हणून शस्त्रक्रियेला सामोरी गेलेल्या कमिनी कोमकर यांचेही निधन झाले.कमिनी यांच्या भावाने, बलराज वाडेकर यांनी सांगितले की, माझ्या बहिणीला मधुमेह किंवा रक्तदाबासारखा कोणताही आजार नव्हता. ती गृहिणी होती.

पतीसाठी तिने हा मोठा निर्णय घेतला. डॉक्टरांनी केवळ 5 टक्के धोका असल्याचे सांगितले होते. मात्र, आता आम्ही बहिणीला गमावले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू.

बापू कोमकर खासगी कंपनीत काम करीत होते. शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी कुटुंबाने घरही गहाण ठेवले होते. दाम्पत्यामागे 20 वर्षीय महाविद्यालयीन मुलगा आणि सातवीत शिकणारी मुलगी, असा परिवार आहे. सह्याद्री रुग्णालयाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करताना म्हटले की, आम्ही रुग्णाच्या कुटुंबीयांच्या या दुःखद परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत आहोत.

लिव्हर ट्रान्सप्लांट ही अतिशय जटिल आणि मोठ्या जोखमीची शस्त्रक्रिया असते. या प्रकरणात रुग्णाला शेवटच्या टप्प्यातील लिव्हरचा आजार होता आणि तो उच्च जोखमीचा रुग्ण होता. प्रोटोकॉलनुसार कुटुंबीयांना या जोखमींबाबत आधीच सविस्तर माहिती देण्यात आली होती. शस्त्रक्रिया सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय नियमांनुसार करण्यात आली.

दुर्दैवाने ट्रान्सप्लांटनंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका (कार्डिओजेनिक शॉक) आला आणि सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. दात्याची प्रकृती सुरुवातीला सुधारत होती; पण शस्त्रक्रियेनंतर सहाव्या दिवशी अचानक रक्तदाब खूप कमी झाला (हायपोटेन्सिव्ह शॉक) आणि त्यानंतर त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले, जे उपचार करूनही नियंत्रित करता आले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT