Maharashtra Politics: अजित पवारांच्या पक्षाची भाजपवर नाराजी; महायुतीतही उडू लागले खटके

शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी
Maharashtra Politics
अजित पवारांच्या पक्षाची भाजपवर नाराजी; महायुतीतही उडू लागले खटकेFile Photo
Published on
Updated on

पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकांचे रणशिंग अखेर फुंकले गेले असून, प्रारूप प्रभागरचना जाहीर होताच महायुतीत खटके उडू लागले आहेत. भाजपने आपला विजय निश्चित करण्यासाठी ‘प्रभाग- रचनेचा डाव’ आखल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

विशेषतः अजित पवारांच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने तोडल्याने राष्ट्रवादीत असंतोष निर्माण झाला असून, याची तक्रार थेट अजित पवार यांच्याकडे करण्याची तयारी त्यांनी केली आहे.

Maharashtra Politics
11th Admission: अकरावीच्या पावणेनऊ लाख जागा रिक्तच; प्रवेशासाठी आता अखेरची फेरी सुरू

शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनीदेखील प्रभागरचनेवर नाराजी व्यक्त करीत स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे, तर विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील या प्रभागरचनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचनेत भाजपने शहराच्या मध्यवर्ती भागातील (कसबा, पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट) प्रभाग जवळपास तसेच ठेवले आहेत. मात्र, उपनगरांसह नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये मोठी उलथापालथ केली आहे. हीच क्षेत्रे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले मानली जात असल्याने पक्षाला थेट फटका बसणार असल्याची चर्चा आहे.

निवडणूक आयोगासह न्यायालयाकडे मागणार दाद; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा इशारा

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभागरचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. नैसर्गिक सीमारेषा ओलांडण्यात आल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला असून, याविरोधात निवडणूक आयोगासह न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी जाहीर झालेल्या या प्रभागरचनेत अनेक प्रभाग चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आले आहेत. काही ठिकाणी नैसर्गिक सीमारेषा ओलांडून दोन भाग एकाच प्रभागात जोडण्यात आले आहेत. अशा चुकीच्या प्रभागरचनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक आयोग व न्यायालयात आक्षेप नोंदविणार आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Dams: राज्यातील धरणांचा पाणीसाठा पोहचला 83 टक्क्यांवर; बहुतांश धरणांचा पाणीसाठा 100 टक्के

प्रभागरचनेबाबतच्या आक्षेपांची जबाबदारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. आपल्या भागात निर्देशांचे उल्लंघन करून प्रभागरचना करण्यात आल्यास त्याबाबतचे आक्षेप 30 ऑगस्टपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात नोंदवावेत, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

प्रभागरचना होण्यापूर्वीच आम्ही यात गडबड केल्याचा आरोप केला होता. याबाबत आम्ही आयुक्तांचीदेखील भेट घेतली होती. मात्र, आमचे ऐकण्यात आले नाही. प्रभागरचना जाहीर झाल्यावर त्यात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. नद्या, नाले, ओढे, डोंगर अशा कोणत्याही सीमा प्रभाग तयार करताना विचारात घेतल्या गेल्या नाहीत. गेल्या आठ वर्षांत भाजपने जनतेला काही दिलेले नाही, त्यामुळे अशा प्रकारची प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. या प्रभागरचनेविरोधात आम्ही लोकशाही पद्धतीने लढा देणार असून, कोर्ट तसेच निवडणूक आयोगाकडेही आम्ही तक्रार करून दाद मागणार आहोत.

- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

या प्रभागरचनेत भाजपचे वर्चस्व आहे. महायुतीचा धर्म पाळला गेलेला नाही. अजित पवारांच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने तोडले गेले असून, राष्ट्रवादी नाराज आहे. आम्ही याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. राज्य सरकारने चार सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. महायुतीतील सर्व पक्षांच्या सोयीचे प्रभाग होतील, अशी अपेक्षा होती. पण, भाजपला सर्वाधिक लाभ होईल, काही प्रमाणात शिवसेनेलाही फायदा होईल. मात्र, राष्ट्रवादीच्या हक्काच्या प्रभागांवर आघात झाला आहे. प्रभागरचना ही शहरविकासासाठी हवी होती, सत्तेसाठी नव्हे. आम्ही या रचनेवर हरकत घेणार असून, पुढील रणनीती ठरवू.

- सुभाष जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभागरचना करताना भाजपने आम्हाला विचारात घेतले नाही. लोकसभा विधानसभेला जसे आम्हाला बोलावण्यात आले होते, तसे महापालिकेच्या प्रभागरचनेच्या वेळी आम्हाला विचारात घेतले गेले नाही. महायुती होईल तेव्हा होईल. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हडपसर येथे आम्हाला बर्‍यापैकी अनुकूल अशी प्रभागरचना आहे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येणार असतील त्या ठिकाणी आम्ही रणनीती ठरवू, आमच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले, याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.

- नाना भानगिरे, शहराध्यक्ष, शिवसेना

राज्य शासन आणि महानगरपालिका प्रशासनस्तरावर अधिकार्‍यांनी ही प्रभागरचना तयार केली आहे. ही प्रारूप यादी आहे. यावर हरकती आणि आक्षेप नोंदविण्यासाठी अवधीदेखील देण्यात आला आहे. निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात. ज्यांना आक्षेप आहे त्यांनी थेट त्यांच्या तक्रारी प्रशासनाकडे कराव्यात. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या प्रारूप आराखड्याचे अवलोकन करणार असून, त्यानुसार आम्ही आमची रचना ठरवू.

- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news