पुणे

Pune News : साहित्य, संस्कृती मंडळाचा डॉ. मोरे देणार राजीनामा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कामात नोकरशाहीचा होणारा हस्तक्षेप, मंडळाची स्वायत्तता संपविण्याचा केला जाणारा प्रयत्न आणि मंडळाचे नाव बदलण्याचा घातलेला घाट याविरोधात मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप वाढत आहे, अशी व्यथा मांडून मी मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. मात्र, या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले असल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली. तर दुसरीकडे डॉ. मोरे यांनी आधीच राजीनामा दिल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरु आहे.

सध्या मंडळाचे नाव बदलून त्याचे साहित्य संचालनालय असे करण्याचा, त्याचे स्वायत्त संस्थात्मक रुप नाहीसे करुन ते सरकारी खात्यात परिवर्तीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविरोधात डॉ. मोरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. याबाबत दै. 'पुढारी'ने डॉ. मोरे यांच्याशी संवाद साधला.

ते म्हणाले, 'मंडळाच्या कारभारात नोकरशाहीचा हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे मंडळाची स्वायत्तता धोक्यात आली आहे. ही गोष्ट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आरोग्याला मानवण्यासारखी नाही. मंडळाचे नाव, उद्दिष्ट, स्वरूप आणि कार्यपद्धती बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'साहित्य संचालनालय' असे नामकरण करून मंडळाचे रूपांतर सरकारी खात्यात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे चुकीचे आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मंडळाच्या सदस्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये अधिकार्‍यांच्या हस्तक्षेपाबाबत चर्चा झाली.

साहित्य आणि संस्कृती मंडळ हे आर्थिकदृष्ट्या स्वायत्त नसले, तरी अन्य बाबतींत स्वायत्त आहे. मात्र, या हस्तक्षेपामुळे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली मंडळाची परंपरा धोक्यात येत आहे, अशी भूमिका सदस्यांनी मांडली होती.' मंडळाची स्वायत्तता संपवण्याच्या या प्रयत्नांविरोधातील ठराव बैठकीत करण्यात आला. हा ठराव राज्याचे मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. केवळ ठरावच पाठविण्यात आलेला नाही तर, त्याबरोबरीने मी राजीनामा देण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. मात्र, त्यानंतर मंत्रिमहोदयांनी या संदर्भात चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे, असे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT