पुणे

नदीपात्रात जलपर्णीचा अक्षरश: खच ; प्रशासनाचे पितळ उघडे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नद्या, विविध तलाव यांसारख्या जलस्रोतांमध्ये वाढलेली जलपर्णी काढल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून वारंवार केला गेला. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मुठा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे वाहत आलेली जलपर्णी वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाजवळील पुलास अडकल्याने प्रशासनाचे पितळ उघडे पडले. शहरातून वाहणार्‍या मुळा-मुठा नद्या, कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलाव, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तलाव, सारसबाग येथील पेशवे पार्क तलाव, पाषाण तलाव, जांभुळवाडी तलाव आणि संगमवाडी ते मुंढवा जॅकवेलपर्यंत नदीपात्र, या जलस्रोतांमधील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेकडून दरवर्षी केले जाते. यंदाही महापालिकेच्या वतीने जलपर्णी काढण्यासाठी लाखोंची निविदा काढण्यात आली.

त्यानंतर जलपर्णी काढल्याचा दावा महापालिका अधिकार्‍यांनी वारंवार केला. जून महिना कोरडा गेल्यानंतर शहर व परिसरात जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस होऊ लागला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये बुधवारी रात्री पाणी सोडण्यात आले. या पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत येऊन महापालिकेजवळील वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाजवळील लहान पुलाला अडकली. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा खच निर्माण झाला होता. या जलपर्णी काढल्याचे सांगणार्‍या प्रशासनाचे पितळ उघडे पडले. दरम्यान, पुलास अडकलेली जलपर्णी प्रवाहाबाहेर काढण्याचे काम दोन जेसीबीच्या साहाय्याने बुधवारी दिवसभर सुरू होते. याच वेळी जलपर्णी प्रवाहाबाहेर काढण्यासोबतच ती पुढे ढकलून देण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT