पुणे

पवार घराण्यात आता लेटरवॉर; एक बारामतीकर या निनावी पत्राची एंट्री

Laxman Dhenge

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रानंतर बारामतीत निनावी पत्राद्वारे त्याला उत्तर देण्यात आले आहे. अजित पवार यांनी पत्राद्वारे आपल्या भूमिकेचे समर्थन केले, तर निनावी पत्रात त्यांच्या बदललेल्या भूमिकेवर कोरडे ओढण्यात आले आहेत. या दोन्ही पत्रांची बारामतीत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विकासासाठीच ही भूमिका घेतली. वडीलधार्‍यांचा कायमच आदर आहे. समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले.

आजही मी फक्त भूमिका बदलली आहे. सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील, ही स्वच्छ भूमिका आहे. यात कोणाचाही, कसलाही अनादर करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता व नसेल. कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे, असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल.

राजेंद्र पवारांवर अन्याय

या पत्राला 'एक बारामतीकर' या नावाने लिहिलेल्या निनावी पत्राद्वारे उत्तर दिले गेले आहे. त्यामध्ये अजित पवार यांनी हे प्रकरण विनाकारण भाव-भावकीच्या तालावर आणून ठेवल्याचे म्हटले आहे. पवार कुटुंबीयांचा तसेच दिवंगत शारदाबाई पवार यांचा इतिहास सांगितला आहे. शिवाय, जेव्हा राजकारणात अजित पवार की राजेंद्र पवार? यांची निवड करायची होती, तेव्हा अजित पवार यांना संधी दिली गेली. त्यातून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवार यांच्यावर अन्याय झाला.

पुढे तो रोहित पवार यांना संधी देत भरून काढला गेला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला असल्याचे म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्याची जळजळीत टीका या निनावी पत्रात केली गेली आहे. या दोन्ही पत्रांची सध्या बारामतीत जोरदार चर्चा सुरू आहे. खा. सुळे यांच्याकडे या पत्रासंबंधी विचारणा केली असता, 'त्यासंबंधी अनभिज्ञ असून, माहिती घेतल्याशिवाय व्यक्त होणार नाही,' असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT