भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन  Pudhari
पुणे

Yoga Day: भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest Pune News)

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, योगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे. गेले ११ वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे. योगसाधना कोणालाही करता येते. शरीर, मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनुरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते.

ही सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर), आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जाते.

यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'एक भूमी, एक आरोग्य' हा संदेश कृतीतून देणारा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकऱ्यांसोबत योगासन करणे ही एकप्रकारे आनंदाची पर्वणी आहे. आज सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करत आहेत. तसेच ७०० महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील योगासनात सहभागी झाले आहेत, ही आनंदाची बाब आहे. आयोजकांनी आरोग्य वारी हे नवीन रिंगण दिले असून ते पुढे कायम चालत रहावे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानुसार हा दीन साजरा केला जातो. आज एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास १० कोटी लोक योग करत असतील अशी अद्भुत किमया झाली आहे.

५ हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योगा, ध्यान, यज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत आहे. आषाढी वारीसाठी दिंड्या जातात अशा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम साजरा केला जावा अशी संकल्पना समोर आली, त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, योग हा पतंजली आणि गौतम बुद्धांनी या मातीत रुजवला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगात नेला. पुणे शहरातील १८७ महाविद्यालये, प्राचार्य, सुमारे १ हजार २०० प्राध्यापक आणि ६ हजार विद्यार्थी या योग दिनाचे नियोजन करत होते. प्रशासन, शासन आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला सामाजिक आशय लाभला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने उपस्थित सर्वांकडून योगाभ्यास करवून घेतला. ताडासन, भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विनोम आदी आसने व प्राणायाम करण्यात आले.जागतिक संगीत दिनानिमित्त अभंग गायन करण्यात आले.

योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी

सरकारने दिलेला एकही शब्द आजपर्यंत फिरवलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येणार आहे. कर्जमाफी करण्यासाठी सर्वगोष्टी तपासून पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT