

शिवनगर: ‘मी कामाचा माणूस आहे. माझी कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. दिलेला शब्द पाळणारा, अशी माझी ख्याती आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या सभासदांचं भलं मीच करणार आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखाना निवडणूक सांगता प्रचार सभेत केले.
या वेळी मंत्री दत्तात्रय भरणे, कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे आदींसह बहुसंख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते. (Latest Pune News)
माळेगाव कारखाना राज्यात उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. असे असताना सत्ताधारी संचालक मंडळाने ही परंपरा कायम राखली आहे. मागील गाळप हंगामाचा उच्चांकी ऊसदर दिला आहे. अद्याप फायनल पेमेंट देणे बाकी आहे. सोमेश्वर कारखाना माझ्या ताब्यात दिला, मी त्या कारखान्याची राज्यात उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना म्हणून ओळख निर्माण केली.
मात्र, विरोधक मी सहकार मोडीत काढायला निघालोय, असा आरोप करतात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मागील पंचवार्षकि निवडणुकीत माझे पॅनेल निवडून दिले. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज केले. असे असताना विरोधकांचे कामकाज तुम्ही पाहिले आहे. त्यांच्या चुकीच्या कामकाजाचा फटका ऊस उत्पादक सभासदांना बसला असून, सत्ताधारी संचालक मंडळाने ते सर्व दुरुस्त केले.
त्यांनी केलेले कर्ज देखील फेडले. यापुढे मी माळेगाव साखर कारखान्याला सर्वतोपरी मदत करणार आहे. मीच कारखान्याचा चेअरमन होणार असल्याने चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडणार नाहीत. अत्यंत काटकसरीने पारदर्शकपणे आणि सर्वांच्या मदतीने कारखाना चालवणार आहे; जेणेकरून राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत ‘माळेगाव’ची जी उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा आहे, ती कायम राखली जाईल, असेही अजित पवार म्हणाले.
तुम्ही आमदार केले, मी मंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे बारामती तालुक्याचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला. माळेगाव कारखान्याचा परिसर देखील मला अत्यंत नावीन्यपूर्ण करायचा आहे आणि हे करताना मी माझ्या पद्धतीने अनेक निधी उभा करेल. यासाठी सभासदांच्या ऊसदरावर कोणताही परिणाम होऊ देणार नाही. मी तुम्हाला ग्वाही देतो की. तुम्हाला इथून पुढे मिळणारा ऊसदर हा सातत्याने राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला देण्याचा प्रयत्न करेन.
माझी काम करण्याची पद्धत तुम्हाला माहीत आहे. इतर सहकारी संस्था देखील मी चांगल्या पद्धतीने चालविल्या आहेत. त्या संस्थांवर अनेक कुटुंबे अवलंबून असतात, याची मला जाण आहे. त्याचप्रमाणे सहकारी संस्था चालविण्याचा मला चांगला अभ्यास आहे. कारखानदारीत माझं बारीक लक्ष असतं, मला त्यातील बारकावे माहीत आहेत.
ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या कष्टाने ऊस पिकवतात आणि तो कारखान्याला घातल्यानंतर त्याचा मोबदला त्यांना चांगला मिळाला पाहिजे, या मताचा मी आहे आणि याचसाठी मी आपल्या कारखान्याचा चेअरमन होणार, असे पवार यांनी जाहीर केले. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
विरोधकांनी माळेगाव कारखान्याचे विस्तारीकरण अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले होते. आमची ज्या वेळेस सत्ता आली, त्या वेळेस त्यांच्या चुकीच्या विस्तारीकरणाचा प्रचंड त्रास झाला. या वेळी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीएसआयच्या तज्ज्ञ समितीने आम्हाला मार्गदर्शन केले आणि हे करताना अजित पवारांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे मागील पाच वर्षांत विक्रमी उत्पादनासह उच्चांकी रोजगार दिला.
- बाळासाहेब तावरे, माजी अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना