Leptospirosis cases increase due to waterlogging
पुणे: शहरात परतीच्या पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसच्या प्रादुर्भावाचा धोका डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत लेप्टोस्पायरोसिसचे 12 रुग्ण आढळून आले आहेत.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते. लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणुजन्य आजार असून, पावसाच्या पाण्यातून वेगाने पसरतो. लेप्टोस्पायरा नावाचे जीवाणू उंदरांसारख्या प्राण्यांच्या मूत्रामधून पसरतात. पाऊस होऊन पाणी साचल्यावर जीवाणू पाण्यात मिसळतात. व्यक्ती दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यास विशेषत: पायांना जखमा किंवा खरचटले असल्यास हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात. (Latest Pune News)
प्रतिबंधात्मक उपाययोजना
दूषित पाण्याचा थेट संपर्क टाळणे.
घरात स्वच्छता राखणे, पाणी साठू न देणे
उंदीर व इतर प्राण्यांचा घरात शिरकाव टाळण्यासाठी उपाय करा.
लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान झाल्यास अँटिबायोटिक्सने हा
आजार प्रभावीपणे बराहोऊ शकतो.
आजाराचा सर्वाधिक धोका कोणाला?
पाणी साचलेल्या भागात काम करणारे लोक उदा. : कामगार, पोलिस.
शहरांमध्ये दूषित पाण्याच्या संपर्कात येणारे नागरिक.
शेतीत किंवा जनावरांसोबत काम करणारे लोक.
लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे सुरुवातीला साध्या फ्लूसारखी वाटू शकतात. यामुळे अनेकदा रुग्ण आणि डॉक्टर यांच्याकडूनही निदान होण्यास विलंब होतो. या लक्षणांमध्ये तीव ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांधे दुखणे आणि उलट्या यांचा समावेश असतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये कावीळ, किडनी निकामी होणे आणि मेंदुज्वर यांसारखी गुंतागुंत होऊ शकते.- डॉ. प्राची साठे, संचालक, अतिदक्षता विभाग व क्रिटिकल केअर युनिट, रुबी हॉल क्लिनिक
पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याचा सर्वांत जास्त धोका असतो. याचे मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि पुराचे पाणी. पावसाळ्यात पुराचे पाणी, गटारे वाहतात. त्यामुळे जीवाणू पिण्याच्या पाण्यात, कालव्यांमध्ये, चिखलात मिसळतात. अशा दूषित पाण्यात-चिखलात पाय, त्वचेचे छिद्र किंवा डोळ्यांद्वारे, किंवा दूषित पाणी पिण्यामुळे हा जीवाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतो. गर्भवती महिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. लेप्टोस्पायरोसिसचा तीव संसर्ग झाल्यास गर्भपात, अपूर्वजन्म किंवा गर्भातील बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो. लहान मुलांना चिखलात, पाण्यात खेळायला आवडते, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण विकसित झालेली नसते. त्यामुळे गर्भवती महिला आणि लहान मुलांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते.- डॉ. करणवीर टोटवाड, एमडी मेडिसीन, व्हेन्सर हॉस्पिटल