नसरापूर: शिवगंगा, गुंजवणी खोर्यातील अनेक गावांत गेल्या महिन्याभरात बिबट्याने हल्ले केले आहेत. तसेच या परिसरात आताही बिबट्यांचे भरदिवसा दर्शन होते. त्यामुळे या खोर्यांत बिबट्यांची मोठी दहशत पसरल्याचे दिसून येत आहे.
माळेगाव, केळवडे, वर्वे, शिवरे आणि परिसरातील गावामध्ये दिवसाढवळ्या लोकवस्तीत बिबट्या दिसून येत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहेत. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला अपयश आल्याची टीकाही नागरिक करत आहेत. (Latest Pune News)
वर्वे (ता. भोर) येथे शनिवारी (दि. 30) विशाल तांबट, संदीप चिकणे यांच्या घराजवळ व भट्टी नावाच्या शेतात बिबट्यांच्या जोडीचे दर्शन झाले. तसेच दोन दिवसांपूर्वी प्रवीण सोंडकर यांच्या वीटभट्टी परिसरात बिबट्या दिसला. तर माळेगाव - केळवडे रस्त्याच्या कडेला दोन ठिकाणी बिबट्या आढळून आले होते.
एकंदरीतच या परिसरात विविध ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत वन विभाग काहीच निर्णय घेताना दिसत नाही. दरम्यान, लोकवस्तीत बिबट्या येत असल्याने नागरिकांनी पिंजरा लावण्यासाठी वन विभागाला निवेदन दिले होते. दिवसाढवळ्या बिबट्या दिसत असल्याने त्याला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, अद्याप वन विभागाने कोठेही पिंजरा लावला नाही, त्यामुळे नागरिकांत बिबट्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी वरवे येथील एका सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला होता. तसेच शेतकरी संजय खोंडगे यांच्या घराबाहेर वासरू बिबट्याने ठार केले होते. करंदी, कांबरे, भोंगवली, पांडे, सावरदरे या परिसरात बिबट्या सतत सावजाच्या शोधात असल्याचेही दिसून आले आहे.
बिबट्याने गोठ्यातील जनावरे, शेळ्या, बकरी यांच्यावर हल्ले केले आहेत. त्यामुळे जनावरांना चारण्यासही पशुपालक धाजवत आहेत. तसेच शेतातील कामे करता येत नसल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची व्यथा शेतकरी मांडत आहेत. याबाबत नसरापूर वनपरिक्षेत्रेचे अधिकारी वसंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
तक्रारदारावरच वन विभागाचा लकडा
अनेकवेळा लोकवस्तीलगत शेजारच्या शेतकर्यांना अथवा नागरिकांना बिबट्या दिसून आल्यानंतर वन विभागाला कळविले जाते. तोपर्यंत बिबट्या निघून जातो. त्यानंतर वन विभागाचे काही कर्मचारी तक्रारदाराचीच उलटतपासणी करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
रेस्क्यू टीममार्फत पशुधन कसे वाचवता येईल व बिबट्या आल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पिंजरा लावण्याबाबत वरिष्ठांना अहवाल देण्यात येणार आहे.- विद्या पवार, वनपाल नसरापूर