भोर: आंबाडखिंड घाटाच्या पायथ्याला असणाऱ्या आंबाडे (ता. भोर) येथील बस स्थानकाजवळ रविवारी (दि. 7) लोकवस्तीत गुरगुरणारा बिबट्या आढळला. या बिबट्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे.
मांढरदेवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबाडे येथील घाटात बिबट्याचा वावर वाढला आहे. आता हा बिबट्या थेट लोकवस्ती परिसरात आला होता. त्याला पाहण्यासाठी नागरिक जमा झाले होते. लोकांची चाहूल लागताच बिबट्याने तेथून पळ काढल्याचे काही नागरिकांनी सांगितले. (Latest Pune News)
याबाबत वन विभागाला माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक संदीप शिवले यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्या असल्याची खात्री केली. दरम्यान, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंबाडे गावाशेजारी जंगल परिसर असल्याने बिबट्याचा वावर या परिसरात आहे. मात्र, बिबट्या एका जागेवर थांबत नाही. घाबरून जाऊ नये, स्वतःची व जनावरांची काळजी घ्यावी. त्याविषयी लवकरच जनजागृती करण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना कोणत्याही क्षणी बिबट्या दिसल्यास वन विभागाशी संपर्क करावा.- शिवाजी राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, भोर