नारायणगाव : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) हद्दीतील खडकमाळ येथील अरुण पोटे यांच्या राहत्या घराजवळ शनिवारी (दि. 8) पुन्हा दोन बिबटे फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. त्यामुळे येथे वन खात्याने पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.(Latest Pune News)
पोटे यांच्या घराच्या परिसरात शुक्रवारी (दि. 7) मध्यरात्री बारा ते अडीच वाजण्याच्या सुमारास तीन बिबटे घिरट्या घालत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यानंतर शनिवारीही दोन बिबटे घराच्या परिसरात दिसून आले. या वेळी पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु या कुत्र्याने बिबट्याचा हल्ला परतवत त्यांना पळवून लावल्याचेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहे. या प्रकाराने पोटे यांनी संताप व्यक्त केला. बिबट्याने आमच्या घरातील एखादा सदस्य ठार केल्यानंतरच वन विभाग पिंजरा लावणार का? असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.
पिंपरी पेंढार हे गाव बिबट्याचे हॉटस्पॉट बनले आहे. या परिसरामध्ये बिबटे रानोमाळ फिरताना दिसतात. येथील नागरिक बिबट्याच्या उपद्रवाने हैराण झाले आहेत. त्यामुळे या बिबट्यांवर वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी काही दिवसांपासून होत आहे. त्यावर कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने ग््राामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत अंकुश तोत्रे म्हणाले, आमच्या परिसरामध्ये मागील वर्षी दोन महिला बिबट्याने ठार केल्या. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रोश केल्यावर वनखात्याने आमच्यावर गुन्हे दाखल केले. आता पुन्हा बिबट्याने आमच्यावर हल्ला केला तर याला जबाबदार कोण? वन खात्याने या संदर्भामध्ये उपाययोजना करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक अधिक वाढेल. आणि याला जबाबदार वन खाते राहील.
पिंपरी पेंढार येथे सीसीटीव्हीत कैद झालेले दोन बिबटे.
इन्सेट : वन विभागाने काडीला कापड बांधून लावलेले औषध.
शुक्रवारी तीन बिबट्या दिसल्यानंतर वनखात्याने घराच्या भोवती लाकडी काडीला कापड बांधून त्याच्यावर एक द्रवरूप औषध सोडले. त्या औषधाच्या वासाने आमच्या कुटुंबातील सदस्यांचे घसे दुखू लागले आहेत. औषध लावतेवेळी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, आता तुमच्या घराच्या आसपास बिबट्या फिरकणारच नाही, असे सांगितले होते. परंतु एका तासातच तब्बल दोन बिबटे घराजवळ आले.अरुण पोटे, ग्रामस्थ, पिंपरी पेंढार