कडूस: जुन्नर तालुक्यात दिसणाऱ्या बिबट्या आता खेड तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि बाजारपेठ असणाऱ्या कङूस (ता. खेड) परिसरात मोठ्या संख्येने दिसू लागला आहे. खेड तालुक्यात बिबट्याने चांगलेच बस्तान बसवले आहे. घरासमोर मुक्त फिरणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कडूस परिसरात बिबट्यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि नागरी भागातील मुक्त वावर यामुळे बिबट्याची दहशत वाढतच आहे.शनिवारी (दि. २७) संध्याकाळी महेंद्र धायबर यांच्या घराकडे चारचाकी वाहनात जात असताना अमोल (गोट्या) ढमाले, शुभम खळदकर, विशाल मोहन ढमाले, आर्यन धायबर, अतुल मोढवे, महेश ढमाले, पनय राजगुरू, भावेश तुपे, महेश नेहेरे, यांनी मोबाईल कँमेरात बिबट्या कैद केला. तर रविवारी (दि. २८) भर दिवसा पाऊस सुरू असताना कङूस गावच्या पाझर तलावा जवळ नागरिकांना दिसला. (Latest Pune News)
परिसरात बागायती क्षेत्र असून बिबट्याचे दिवसा दर्शन होत असून कुत्रा, शेळी, कोंबडी, आदी पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे शेतकरी हतबल झाले असून परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुर्वी शेतात शेवारात दिसणारे बिबटे आता रात्रीच्या वेळी कङूस गावठाणात असणाऱ्या नागरि वस्तीत येऊ लागले आहेत. बिबट्याचा संचार वाढला असून ग्रामस्थांची मात्र झोप उडालीअसल्याचे उद्योजक शुभम खळदकर यांनी सांगितले.
सद्या शिवारात कांदा लागवडी सुरू असून जंगलात संचार करणारे बिबटे सद्या नागरीवस्तीत येऊन जनावरे व माणसांना लक्ष्य करत आहे. यामुळे शेतात जाणे अवघड झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ महेंद्र धायबर यांनी सांगितले.