पिंपरखेड घटनास्थळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी. सोबत पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल आणि इतर. (छाया : आबाजी पोखरकर) Pudhari
पुणे

Leopard Safari Pune: शक्य त्या वनक्षेत्रात बिबट सफारीचे प्रस्ताव पाठवा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे वन विभागाला आदेश

पिंपरखेड-जांबुत परिसरातील घटनांनंतर प्रशासनाचा पुढाकार; बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरखेड : वन विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात बिबट सफारी उभी करण्यासाठीचे प्रस्ताव लगेच पाठवून द्यावेत, असे निर्देश वन विभागाला देण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक निधीची आपण त्वरित उपलब्धता करून देऊ. प्रशासनाने देखील त्याच्या खाद्याची व्यवस्था करून यासंदर्भात आपण लगेचच कार्यवाही सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वन विभागाला मंगळवारी (दि. 4) दिले.(Latest Pune News)

दोन आठवड्यांमध्ये साडेपाचवर्षीय शिवन्या बोंबे, वृद्ध महिला भागूबाई जाधव आणि 13 वर्षीय रोहन बोंबे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटना पिंपरखेड आणि जांबुत येथे घडल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी (दि. 4) जिल्हाधिकारी डुडी यांनी तीनही कुटुंबांना भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ज्या भागात अधिकच्या प्रमाणात वन विभागाचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी सफारी उभी करण्यात यावी तसेच त्यासाठी लागणारे आवश्यक खाद्य आम्ही शेतकरी पुरवू; मात्र या भागात एकही बिबट्या राहणार नाही, असा पवित्रा पिंपरखेड (ता. शिरूर) ग्रामस्थांनी घेतला होता. तेव्हा जिल्हाधिकारी डुडी यांनी हे निर्देश दिले.

याप्रसंगी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, जुन्नरच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे उपस्थित होते.

परिसराची परिस्थिती ही अत्यंत भयानक असून, या ठिकाणी ऊसक्षेत्र अधिक दिसत असल्याने बिबट्याला संचार करण्यासाठी योग्य स्वरूपाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे आजपासून पुढील काळात वन विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने योग्य उपाययोजना करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. या भागातील बिबट्यांच्या हल्ल्याची संख्या पाहता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे वास्तव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले, तसेच या भागातील शाळांना तत्काळ संरक्षक भिंत करून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. यावर संबंधित महसूल व वनप्रशासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ कार्यालयाला सादर करून त्यासाठी देखील आपण निधी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बिबट्यांच्या हल्ल्यात मदत झाल्यानंतर संबंधित मयताच्या नातेवाइकांना 25 लाख रुपयांची मदत वन विभागाकडून देण्यात येत असते. मात्र, गेलेल्या जिवाची किंमत 25 लाख होऊ शकत नसून ज्या कुटुंबामध्ये अशी परिस्थिती उद्भवेल अशा कुटुंबातील एका सदस्याला प्रशासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी उपस्थित ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडे केली. या मागणीचा विचार करता वरिष्ठपातळीवर आपण यासंदर्भात योग्य चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT