काटेवाडी परिसरात बिबट्याची अफवा; परिसरात मोठी घबराट pudhari
पुणे

Leopard in Katewadi: काटेवाडी परिसरात बिबट्याची अफवा; परिसरात मोठी घबराट

वन विभाग व रेस्क्यू टीमने केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

काटेवाडी: बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरात बुधवारी (दि. 3) रात्री बिबट्या दिसल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. परंतु, पायाचे ठसे व वर्णन पाहता पाहिलेला प्राणी बिबट्या नसल्याने लोकांनी घाबरू नये, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बारामती-इंदापूर रस्त्यावरील काटेवाडी परिसरातील काटेवस्ती येथे बुधवारी रात्रीच्या वेळी दक्षिण बाजूने रस्ता पार करून उत्तरेला बिबट्या जात असल्याचे काटेवाडीतील दुचाकीचालकाने पाहिले. त्यामुळे काटेवाडी, लिमटेक परिसरात गुरुवारी (दि. 4) सकाळी येथील नागरिकांमध्ये बिबट्या पाहिल्याची चर्चा सर्वत्र पसरली.

याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल बी. व्ही. गोलांडे, रेस्क्यू टीमचे कांबळे, त्यांचे सहकारी ग्रामस्थ रणजित गायकवाड, शीतल काटे घटनास्थळी पोहचले. त्यांनी काटेवस्ती परिसरातील स्थानिकांशी व ज्यांनी रस्ता ओलाडून बिबट्या जात असल्याने पाहिले त्यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी रात्र असल्याने व्यवस्थित पाहता आले नाही.

मात्र, तांबूस रंगाचा प्राणी असल्याचे सांगितले. त्यामुळे रस्त्याच्या बाजूच्या शेतात पावलांच्या ठशांचे निरीक्षण केले; मात्र ते ठसे बिबट्याचे नसल्याचे सांगण्यात आले. तरीदेखील वन विभाग व रेस्क्यू टीमने रस्त्याच्या परिसरातील उभ्या पिकांमध्ये व उसामध्ये देखील या प्राण्याचा शोध घेतला. परंतु, लोकांनी वर्णन केलेला प्राणी कोठेही आढळून आला नाही. ठोस माग न आढळ्याने प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलेल्या त्याच्या वर्णनावरून हा प्राणी बिबट्या नसल्याचे रेस्क्यू टीमचे कांबळे यांनी सांगितले.

गैरसमज पसरवू नका : वन विभाग

श्री छत्रपती कारखान्यामुळे ऊसपिकांचे क्षेत्र येथे जास्त आहे. त्यामुळे हा परिसर जंगली प्राण्यांसाठी सुरक्षित आहे. त्यातच बिबट्या दिसल्याच्या अफवेने स्थानिक रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी दिवसभर येथील शेतकर्‍यांनी शेतात जाण्याचे टाळले. परिसरात आढळलेले ठसे कुत्र्याचे अथवा इतर प्राण्याचे आहेत. बिबट्या किंवा त्याच्या बछड्याच्या पायाचे ठसे मोठे आणि रुंद असतात. त्यामुळे कोणीही घाबरू नये आणि गैरसमज पसरवू नये, असे आवाहन वनपाल बी. व्ही. गोलांडे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT