आळेफाटा/बेल्हे: नळावणे (ता. जुन्नर) शिवारातील देशमुखवस्ती येथे शनिवारी (दि. २९) मध्यरात्रीनंतर विहिरीत पडलेल्या बिबट्यास ग्रामस्थ व वनविभागाच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यास यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की, जुन्नर तालुक्याच्या पूर्व पठार भागावरील नळावणे शिवारात अन्न- पाण्याच्या शोधात शनिवारी मध्यरात्रीनंतर फिरणारा बिबट्या देशमुखवस्ती येथील चंद्रकांत बबन देशमुख यांच्या विहिरीत पडला.
रविवारी (दि. ३०) सकाळच्या सुमारास देशमुख हे आपली विहिरीवर गेले असता बिबट्या विद्युत पंपचा पाईप कुरतडून विहिरीचे कपारीत बसला असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागास दिली. बेल्हे वनपरिमंडळच्या वनपाल नीलम ढोबळे, वनरक्षक राजेंद्र गाढवे वनरक्षक विश्वराज सोळंके, वनमजूर जिजाबा भंडलकर यांचेसह आळे वन परिमंडळ व नगदवाडी वनपरमंडळाच्या रेस्क्यू टीम हे सकाळ घटनास्थळी आले.
ग्रामस्थांचे सहकार्याने पिंजरा विहीरीत सोडण्यात आला. अर्ध्या तासात हा बिबट्या या पिंजऱ्यात हा जेरबंद झाला. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.
या जेरबंद बिबट्यास माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले असून तो पाच वर्षे वयाचा नर जातीचा असल्याचे वनविभागाचे वतीने सांगण्यात आले.