मंचर : जुन्नर वन विभागांतर्गत मानव-बिबट संघर्षाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पिंजऱ्यात पकडलेला बिबट सोडला जाणार नाही. तो माणिकडोह बिबट निवारा केंद्रात उपलब्ध पिंजऱ्यात ठेवण्यात येईल. नंतर तो वनतारा येथे स्थलांतरित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पुणे येथील वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी दिले.(Latest Pune News)
पिंपरखेड-जांबुत तालुका शिरूर येथे बिबट्यांच्या हल्ल्यात मयत झालेल्या तीन घटनानंतर आंबेगाव-शिरूर तालुक्यात नागरिकांचा प्रचंड संताप झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील गायमुख फाटा येथील नंदी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी वन विभागाकडे विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. या मागण्यांबाबत पुणे येथील वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच या मागण्यांबाबत वन विभागाने काय उपाययोजना केल्या व काही मागण्या किती कालावधीत पूर्ण होतील याबाबत निवेदन जारी केले.
सद्य:स्थितीत वन विभागाकडे 200 पिंजरे असून जिल्हाधिकारी यांनी अजून 200 नवीन पिंजरे खरेदी करण्याची प्रशासकीय मान्यता दिली आहे. नवीन 200 पिंजऱ्यांपैकी 17 पिंजरे पिंपरखेड परिसरात प्राप्त झाले आहेत. सद्य:स्थितीत परिसरात 33 पिंजरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. 15 ते 20 दिवसांत उर्वरित पिंजरे विभागास प्राप्त होतील. यासाठी आवश्यक कालावधी 5 डिसेंबर 2025 असा निश्चित करण्यात आला आहे.
शिरूरमध्ये 200 बिबट ठेवण्यासाठी निवारा केंद्र उभारण्यासाठी निर्देश प्राप्त झाले आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबटे मारण्याची परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले.