नारायणगाव: कुमशेत परिसरामध्ये दहशत माजवणारा नरभक्ष बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. शनिवारी (दि. २७) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. वन खात्याने पकडलेला बिबट्या नर असून त्याचे वय नऊ वर्षापेक्षा अधिक असल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली.
पकडलेला बिबट्या हा नरभक्षक आहे किंवा कसे याच बिबट्याने सिद्धार्थला ठार केले का? याबाबतचा तपास देखील तातडीने केला जाणार आहे. बिबट्याच्या नखांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. दरम्यान पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. (Latest Pune News)
नरभक्षक बिबट्याला आमच्या समोरच गोळ्या घाला, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी करीत बिबट्याला घेऊन जाणारी गाडी रोखून धरली होती. वरिष्ठ कार्यालयाची अनुमती आल्यावर या बिबट्याला तात्काळ गोळ्या घालू, असे लेखी पत्र वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी नागरिकांना दिल्यावरच स्थानिक नागरिकांनी बिबट्याला घेऊन जाणारी गाडी सोडली.
वन खात्याने या बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरामध्ये तब्बल दहा पिंजरे लावले होते, तसेच ट्रॅप कॅमेरे व ड्रोन कॅमेरा देखील या ठिकाणी लावण्यात आले होते. वन खात्याची फौज देखील बिबट्याला पकडण्यासाठी दोन दिवसापासून प्रयत्न करत होती. पावसामुळे बिबट्याला पकडण्यात अपयश येत होते. घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या जेरबंद झाला.
बिबट्याने उघड्यावर असलेल्या पडवीत घुसून सिद्धार्थला बाहेर फरपटत नेऊन ठार केल्याने कुमशेत परिसरामध्ये वन खात्याच्या विरोधात मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. दरम्यान जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली असून या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गांची आहे. ३० सप्टेंबर रोजी यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली.