शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा
करंदी (ता. शिरूर) येथे एका उसाच्या शेतामध्ये तोडणी सुरू असताना मजुरांना शेतात बिबट्यांची चार पिल्ले आढळून आली. बिबट्यांच्या या भागातील वावराने खळबळ उडाली आहे. वनविभाग तसेच वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सभासदांनी या ठिकाणी जाऊन या पिल्लांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे.
करंदी येथील सीताराम कंद्रूप यांच्या शेतात सोमवारी (दि.14) उसतोड सुरू असताना मजुरांना उसाच्या शेतात चार बिबट्यांची पिल्ले दिसून आली, याबाबतची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनरक्षक बबन दहातोंडे, पोलिस पाटील वंदना साबळे, वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, सचिव शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
या वेळी वनरक्षक तसेच वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सभासदांनी या पिलांना या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवून दिले. या वेळी बोलताना वनरक्षक बबन दहातोंडे यांनी सांगितले की, ही पिल्ले खूप लहान असून, रात्रीच्या सुमारास त्या पिलांची आई असलेली बिबट मादी पिलांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करेल.
शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यांना निवारा मिळत आहे. त्याच ठिकाणी भक्ष्यदेखील मिळत असतात, सध्या बिबट्यांचा प्रजनन काळ असताना उसतोड देखील सुरू आहे, त्यामुळे बिबट्यांची पिल्ले आढळून येत आहेत. तसेच उसतोडीमुळे बिबट्यांसाठी निवारा मिळत नाही, असे श्रीकांत भाडळे यांनी सांगितले.