पारगाव: उत्तर पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ऊसतोड कामगार, मेंढपाळ, भटकंती करणाऱ्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे गावामध्ये सोमवारी (दि. 15) सकाळी कांदा काढण्याच्या कामासाठी आलेल्या मजूर कुटुंबातील आठवर्षीय रोहित बाबू कापरे या मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला. या अगोदर येथून जवळच असलेल्या पिंपरखेड गावात शिवन्या बोंबे, रोहन बोंबे, जांबुत गावात भागुबाई जाधव या तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे
जिल्ह्याचा उत्तर भाग हा बागायती आहे. प्रामुख्याने उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात. नोव्हेंबर महिन्यापासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊसतोडीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. बीड, पाथर्डी, चाळीसगाव, अहिल्यानगर भागातील ऊसतोड कामगारांची कुटुंबे या परिसरात दाखल झाली आहेत. ऊसतोडीमुळे बिबट्याची लपण जागा राहिली नाही. त्यामुळे बिबटे सैरभैर झाले आहे.
सध्या या भागातील अनेक गावोगावी शेतकऱ्यांसह नागरिकांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. रात्रीच्या वेळी चार चाकीतून प्रवास करताना हमखास बिबट्याचे दर्शन होते. ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी भल्या पहाटेच अंधार असताना उसाच्या फडात दाखल होतात. त्यांच्या समवेत त्यांची लहान-लहान मुलेदेखील असतात. ऊसतोडणीचे काम सुरू असताना ही मुले उसाच्या बांधावर खेळत असतात. अनेकदा त्यांच्याकडे त्यांच्या आई-वडिलांचे लक्ष नसते. दरम्यान अनेकदा या मुलांच्या बाबतीत दुर्घटना घडल्या आहेत.
बाराही महिने या परिसरात विविध शेती कामे सुरू असतात. शेतकऱ्यांना कायमच मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या परिसरात वर्षातील बहुतांशी महिने परजिल्ह्यातील शेतमजूर येत असतात. सध्या या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यवतमाळ, परभणी, रायगड, हिंगोली, भंडारदरा या जिल्ह्यातील शेतमजूर मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहे. जुन्नरच्या पारगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराच्या निष्पाप मुलाचा बळी गेल्याने या मजुरांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.
याच भागात अहिल्यानगर जिल्ह्यातील धनगर मेंढपाळ मोठ्या प्रमाणावर चाऱ्याच्या शोधात येत असतात. त्यांचे शेळ्या-मेंढ्यांचे वाडे शेतातच मुक्कामी असतात. रात्रीच्या वेळी मेंढपाळांचे कुटुंब उघड्यावरच झोपते. अनेक मेंढपाळांवर बिबट्यांचे हल्ले झालेल्या घटना घडल्या आहेत. मेंढपाळांच्या लहान मुलांवरही हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.