पुणे

लोकसभेला महायुतीचे नेते एकत्र; कार्यकर्ते दुरावलेले

Laxman Dhenge

मंचर : सत्ताधारी महायुती पक्ष सरकारमधील नेते एकत्र काम करीत आहेत. वरिष्ठपातळीवर त्यांचे जमते आहे. जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांतील कार्यकर्ते, नेत्यांमध्ये आपापसांत दुरावा असल्याचे चित्र पाहावयास
मिळत आहे. गावातील, शहरातील विविध कार्यक्रमांना नेते, कार्यकर्ते एकमेकांना टाळत असून अनेकदा जाहीर कार्यक्रमात एकमेकांचे उणेदुणे काढताना दिसत आहेत. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, नेते, हे वरिष्ठांनी दिलेल्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करतील का याबाबत प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण होत आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन केव्हा होणार यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.

स्थानिक राजकारणातील स्पर्धेतून गावपातळीवर याच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांमध्ये छोटे-मोठे राजकीय वाद आजही कायम आहेत. अनेकदा एकमेकांच्या मंजूर केलेला विकासकामांच्या श्रेयवादावरून शाब्दिक चकमक होत आहे. अनेक सामाजिक, राजकीय कार्यक्रमात एकमेकांवर टीका सुरू आहे. एकमेकांच्या कार्यक्रमाला आमंत्रित न करणे, एखाद्या कार्यक्रमात आला तर भाषणात त्याचे नाव न घेणे असे प्रकार सुरू आहेत. स्थानिक नेत्यांचे अजूनही सूर जुळले नसल्याचे चित्र आहे. गावातील सोसायटी, ग्रामपंचायत, पतसंस्था इतर निवडणुकीतही हे पक्ष स्वतंत्रपणे भूमिका मांडत आहेत.

आपापले उमेदवार उभे करत असल्याने त्यांच्यातील दुरावा वाढत आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी गावपातळीवर मात्र शांततेच्या भूमिकेत आहेत. त्यांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. राज्यात घडलेल्या घडामोडीमुळे अनेक कार्यकर्ते पक्षाशी दुरावले. स्वतःला पक्षाचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून घेणारे गेली अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत. या कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत. वर्षांनुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पक्षाचा प्रचार केला, विरोधी पक्षातील नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर टीका केली. मात्र, आपलेच वरिष्ठ नेते त्या पक्षाला जाऊन मिळाले असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी झाली असून ते पक्षापासून दुरावले आहेत.

नेते कार्यकर्त्यांचा विचार कधी करणार?

अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही आपला विचार केला जात नाही. आपले वरिष्ठ नेते अचानक पक्षांतराचा निर्णय घेतात, ही कारणे पक्षापासून दुरावण्याची असल्याचे पहावयास मिळत आहे. राज्यपातळीवर मनोमिलन झाले असले तरी गावपातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन कधी होणार याकडे मात्र वरिष्ठ नेते गांभीर्याने पाहात नसल्याचे दिसून येते. वरिष्ठ नेते पक्ष आदेश म्हणून उमेदवारांना विजयी करण्यासाठी केलेले आवाहन स्थानिक पातळीवर कार्यकर्ते गांभीर्याने मनावर घेतली का यावरच उमेदवारांचे भवितव्य असल्याचे दिसून येते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT