लक्ष्मण हाकेंची अजित पवार, शरद पवारांवर जोरदार टीका Pudhari
पुणे

Laxman Hake Criticism: लक्ष्मण हाकेंची अजित पवार, शरद पवारांवर जोरदार टीका

Laxman Hake News: बारामतीत ओबीसींचा एल्गार मोर्चा, मेळावा

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामतीत शुक्रवारी (दि. 5) ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा व मेळावा पार पडला. या मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

गेवराईत अजित पवार यांच्या आमदारानेच आमच्यावर हल्ला केला असे हाके म्हणाले. दरम्यान, हाके यांच्या भाषणावेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा त्यांना फोन आला. आंबेडकर यांनीही फोनद्वारे उपस्थितांशी संवाद साधत आरक्षणप्रश्नी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असे आवाहन केले. (Latest Pune News)

बारामतीतील शारदा प्रांगणातून निघालेला मोर्चा प्रशासकीय भवनावर गेला. तेथे विविध वक्त्यांनी भाषणे केली. या वेळी हाके यांनी पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, कोणत्याही पक्षाची सत्ता आली तरी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहात आहे.

गावगाड्यात 50 टक्क्यांहून अधिक ओबीसी आहेत. पण, पवार हे एक टक्क्याच्या वर तरतूद करत नाहीत. आमच्या अनेक पिढ्यांचे शोषण केले गेले. आजारी कारखान्यांसाठी पुरवणी निधीद्वारे अजित पवारांनी निधी दिला. पण, त्यांच्याकडे आमच्यासाठी पैसे नाहीत. पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होत होती. आता जर ओबीसी आरक्षण पडले तर ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी अशी लढत होईल.

देशभरात मंडल आयोग लागू झाला होता. फक्त राज्यात लागू नव्हता. मंडल आयोगाची चळवळ शेकापचे दि. बा. पाटील, बबनराव ढाकणे, शिवाजीराव शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे, बाळासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी पुढे नेली.

ओबीसी एल्गार यात्रा बारा जिल्ह्यांत जाणार आहे. आपण एकेकाला कोणत्या कारखान्याच्या गेटवर आडवायचे, कोणत्या एमआयडीसीत तुडवायचे हे धोरण ठरवू असे ते म्हणाले.

या मेळाव्यात अ‍ॅड. मंगेश ससाणे, अ‍ॅड. मृणाल ढोले, विश्वास देवकाते, काळूराम चौधरी, पांडुरंग मेरगळ, नवनाथ वाघमारे, नवनाथ पडळकर, संदीप चोपडे, अमोल सातकर, नानासाहेब मदने, संदीप हिंगणे, ज्ञानेश्वर कौले, वनिता बनकर, नीता बारवकर, गोविंद देवकाते, ज्ञानेश्वर कौले आदींची उपस्थिती होती. यासह विविध पक्षातील मान्यवर व ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांपैकी अनेकांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

या ओबीसी एल्गार मेळाव्याला शहर पोलिस ठाण्याने परवानगी नाकारली होती, तरीही मोठ्या संख्येने मोर्चा निघाला, मेळावा पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT