पुणे : सुवर्णा चव्हाण
परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले..; पण लावणी नृत्यकलेने कलाकार म्हणून जगण्याची नवी वाट दिली... मात्र, शिक्षणाची इच्छा मनात कायम होती... मग, काय? तिने कलेसह शिक्षणाची वाट शोधली अन् आज ती कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे. रंगमंचावरही अस्सल मराठमोळी लावणी सादर करत मने जिंकत आहे... ही कहाणी आहे लावणी कलाकार अमिता यांची.
अमिता यांच्यासारखे आज कित्येक युवा लावणी कलाकार महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लावणी कला जोपासत शिक्षण घेत आहेत. कोणी पीएच.डी. पूर्ण करत आहे, तर कोणी बारावीचे शिक्षण घेत आहे. कोणी वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. तर कोणी व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणत लावणी कलाकारही मोठ्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने शिकत आहेत.
लावणी कलाकार पूनम दीपक रूपवते म्हणाल्या, परिस्थितीमुळे मला कलेची वाट मिळाली; पण या कलेनेच मला कलाकार म्हणून ओळख मिळवून दिली आहे. मी सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (औंध) येथे वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. शिक्षण घेण्यासाठी कुटुंबीयांचा पाठिंबा आहे.
आज रंगमंचावर कला सादर करताना खूप आनंद वाटतो. कारण, आमच्या लावणी सादरीकरणाला राज्यभरातील रसिक भरभरून दाद देतात. ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. शिक्षणही महत्त्वाचे आहे. म्हणूनच कलेसह शिक्षणासाठी वेळ काढून बारावीचा अभ्यास करत आहे. लावणीला आदर द्यावा, असे अस्मिता पुणेकर यांनी सांगितले.
प्रत्येकीला कलेसह शिक्षण पूर्ण करावे, असे वाटते. याच विचाराने मीही शिक्षणाकडे वळले. मी वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. मी सकाळी महाविद्यालयाला जाते आणि कार्यक्रमांसाठीही वेळ काढते. मनात जिद्द असेल, तर आपल्या स्वप्नांसाठी आपण नक्कीच मेहनत करतो आणि वेळ काढतो. मीही तेच करते. प्रतीक्षा गायकवाड