पुणे

brain tumor : ब्रेन ट्युमरचे उशिरा निदान चिंताजनक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेंदूतील ऊतींची जास्त प्रमाणात वाढ झाल्यास त्यांची गाठ तयार होते आणि इथूनच ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजाराला सुरुवात होते. ब्रेन ट्युमरमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, दृष्टी कमकुवत होणे, थकवा जाणवणे अशी सामान्य लक्षणे दिसतात. बरेचदा याकडे दुर्लक्ष होत असल्याने ब्रेन ट्युमरचे उशिरा होणारे निदान चिंताजनक ठरत आहे.

ब्रेन ट्युमर, प्रतिबंध करण्याचे मार्ग, सर्वोत्तम उपचार कसे करावे आणि ब्रेन ट्युमरचे निदान झालेल्या लोकांची सर्वोत्तम काळजी कशी घ्यावी, याबाबत जगभरात संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. ब्रेन ट्युमरची गाठ प्रत्येक वेळी कॅन्सरचीच असते असे नाही. काही प्रकारच्या ट्युमरची वाढ वेगाने, तर काहींची संथ गतीने होते. ब्रेन ट्युमरचे पहिल्या टप्प्यातच निदान व्हावे, यासाठी जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ युध्दपातळीवर काम करत आहेत.

ब्रेन ट्युमरची कोणतीही लक्षणे दीर्घकाळ दिसू लागल्यास ताबडतोब न्युरोलॉजिस्टचा सल्ला आणि तपासणी करून घेणे आवश्यक असते. योग्य वेळी निदान झाल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. याशिवाय आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी, निरोगी जीवनशैली, व्यायाम आणि चांगली झोप हेही रुग्णांसाठी महत्त्वाचे असते, असा सल्ला न्युरॉलॉजिस्ट डॉ. दीपक मेहता यांनी दिला आहे.

ब्रेन ट्युमरवरील उपचार

  • रेडिएशन थेरपी
  • टार्गेटेड थेरपी
  • इम्युनोथेरपी
  • बायोमार्कर
  • जीन थेरपी
  • ड्रग कॉम्बिनेशन

ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करताना मेंदूचा प्रत्येक भाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे ट्युमर मेंदूच्या इतर भागात पसरला असेल, तर शस्त्रक्रियेने समूळ काढणे शक्य नसते. अशा वेळी केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचा उपयोग केला जातो. यामध्ये रेडिएशनच्या साहाय्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात. शस्त्रक्रियेनंतर साधारण 2-3 महिन्यांनंतर एमआरआय काढला जातो. ब्रेन ट्युमरच्या उपचारांमध्ये रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीप्रमाणेच पॅथॉलॉजिकल रिपोर्टही महत्त्वाचा असतो. यामध्ये ग्रॉस पॅथॉलॉजी, हिस्टोपॅथोलॉजी, इम्युनोबायोकेमिस्ट्री आणि जेनेटिक अ‍ॅनॅलिसिस या प्रगत पध्दती वापरल्या जातात.

– डॉ. समीर फुटाणे,
न्युरोसर्जन, सह्याद्री हॉस्पिटल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT