पुणे : पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने शहरातील वाहतूक मंदावली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर खड्डे दिसल्यास संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतरही सर्व परिस्थिती 'जैसे थे'च असल्याचे चित्र आहे.
समान पाणीपुरवठा आणि ड्रेनेजलाईनच्या कामांमुळे मागील वर्षी शहरातील लहान-मोठे रस्ते खोदण्यात आले. खोदाईनंतर योग्य पद्धतीने रस्ते दुरुस्त न केल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. रस्त्यावरील खड्ड्यांवरून प्रशासनावर टीका झाल्यानंतर डीएलपीमध्ये (दायित्व कालावधी) असलेल्या ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्या रस्त्यांचे काम करणार्या ठेकेदारांवर कारवाई केली. तसेच पावसाळा संपताच प्रमुख रस्त्यांचे पाच विभाग करून निविदा प्रक्रिया राबविली. यापैकी दोन झोनमधील कामे झाली आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांवरून महापालिका आयुक्तांनी नुकतेच पथ विभागाचे कान टोचले.
खड्डे दुरुस्त करण्यासाठी आठवड्याचा कालावधी आयुक्तांनी दिला असून, त्यानंतर खड्डे दिसल्यास संबंधित अभियंत्यावर कारवाईचा इशारा दिला. या इशार्याला आठवडा झाला तरी शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मध्य शहराच्या तुलनेत उपनगरांमधील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून, सिग्नलवर हजारो वाहने अडकून पडत आहेत.
हेही वाचा :