‘बम बम भोले’ने दुमदुमले शहर; शेवटच्या श्रावणी सोमवारी मंदिरात विविध धार्मिक उपक्रम  Pudhari
पुणे

Last Shravani Somwar: ‘बम बम भोले’ने दुमदुमले शहर; शेवटच्या श्रावणी सोमवारी मंदिरात विविध धार्मिक उपक्रम

ढोल-ताशांचा घुमला आवाज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ढोल-ताशांचा गजर अन् सनईचे मंजूळ स्वर, भजन-कीर्तनाने प्रसन्न झालेले वातावरण अन् शिवशंकराची भक्तिपूर्ण आराधना... असे चैतन्यपूर्ण वातावरण सोमवारी (दि. 18) शहर आणि उपनगरातील शिवमंदिरांमध्ये पाहायला मिळाले.

श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने बरसणार्‍या श्रावण सरींतही सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. श्री ओंकारेश्वर मंदिर, श्री वृद्धेश्वर-सिद्धेश्वर मंदिर, पाताळेश्वर लेणी येथील शिवमंदिर अशा विविध मंदिरांमध्ये ‘हर हर महादेव’चा जयघोष दुमदुमला. भजन-कीर्तन, भक्तिगीतांच्या कार्यक्रमांत भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, तर यानिमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन केले होते.  (Latest Pune News)

श्रावणी सोमवारला शिवशंकराची उपासना केली जाते, त्यामुळे श्रावणातील सोमवारला मोठे महत्त्व आहे. यानिमित्ताने शहर आणि उपनगरांतील रुद्राभिषेकापासून ते महापूजेपर्यंत...भजन-कीर्तनापासून ते प्रवचनांपर्यंतचे धार्मिक कार्यक्रम रंगले. प्रवेशद्वारावर रांगोळीच्या पायघड्या, तोरण, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि रंगबिरंगी पताकांच्या सजावटीने लक्ष वेधले. श्रावणसरींतही मंदिरांमध्ये चैतन्यमयी, उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरण मंदिरांमध्ये पाहायला मिळाले.

ढोल-ताशावादनातून श्री ओंकारेश्वराला मानवंदना

मुठा नदीच्या किनारी उभारलेले, नऊ घुमटांनी सजलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीचे सुंदर दर्शन घडवणार्‍या पुण्याच्या पेशवेकालीन श्री ओंकारेश्वर मंदिरात तब्बल 11 ध्वजपथकांसह ढोल ताशा वादकांनी श्री ओंकारेश्वराला मानवंदना दिली. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त ‘श्री ओंकारेश्वर चरणी मानवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर, गौरव बापट, विशाल घरत आदी उपस्थित होते. मानवंदना देण्याकरिता सहभागी 11 पथकांमध्ये रमणबाग, शिवगर्जना, ज्ञान प्रबोधिनी, श्रीराम, स्वरूपवर्धिनी, नादब्रह्म, युवा, अभेद्य, गरवारे, शिवमुद्रा, गजलक्ष्मी या पथकांचा समावेश होता.

तसेच, समर्थ प्रतिष्ठानचे स्थिरवादन देखील यावेळी झाले. धनोत्तम लोणकर म्हणाले, यंदा शेवटच्या श्रावणी सोमवारी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि वादकांच्या उपस्थिती महाआरती करण्यात आली.

भुलेश्वर येथे कावड व पालखी मिरवणूक

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील देवस्थान श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी (दि. 18) भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दिवसभरात हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवलिंगाची अर्धनारीनटेश्वर पूजा साकारण्यात आली. पहाटे शिवलिंगास दही, दूध व पंचामृताने अभिषेक घालण्यात आला.

सकाळी 5 वाजता महाआरतीने विधींची सुरुवात झाली. माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी महापूजा केली. तसेच आमदार विजय शिवतारे, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, अक्षरसृष्टी संस्थेचे शिद्धनाथ पवार, पंचायत विस्तार अधिकारी संतोष नेवसे, ग्रामपंचायत अधिकारी विलास बडधे, नीरा बाजार समितीच्या संचालिका शाहजान शेख यांनीही दर्शन घेतले. रविवारी (दि. 17) सासवड येथील मानाच्या कावडीचे प्रस्थान होऊन सोमवारी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात कावड भुलेश्वर मंदिरावर आणण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT