पाटस: दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावांनी चुलत भाऊ कैलास हगारे या शेतकर्यावर जीवघेणा हल्ला करीत हात व पाय तोडल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी (दि. 26) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी प्रवीण व नंदा हगारे या दोघा भावांना अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.
जखमी कैलास हगारे यांची मुलगी अनुष्का हिने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पूर्वीपासून हगारे कुटुंबीयांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता. याच वादातून गुरुवारी सोमनाथ, प्रवीण, गणेश, नंदा, प्रतीक्षा व प्रांजल (सर्व रा. बिरोबावाडी, ता. दौंड) या सहा जणांनी मिळून कैलास यांच्यावर कोयता, तलवार, कुर्हाड यांसारख्या धारदार हत्यारांनी हल्ला चढविला. (Latest Pune News)
या हल्ल्यात कैलास यांचा उजवा हात मनगटापासून, तर डावा पाय नडगीपासून तोडण्यात आला. या गंभीरप्रकरणी संबंधित आरोपींवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रवीण आणि नंदा यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संपांगे करीत आहेत. दरम्यान, यापूर्वी सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे आणि गणेश हगारे यांनी जखमी कैलास हगारे यांना मारहाण करून त्यांचा डावा पाय गंभीर जखमी केला होता. त्याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.