पुणे

शालेय सहलीसाठी लालपरीला प्राधान्य

Laxman Dhenge

पिंपरी : ख्रिसमस, गॅदरींग, नवीन वर्ष या दिवसांत शाळांमधून सहलींचे नियोजन केले जाते. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांत शाळांकडून सहली आयोजित केल्या जातात. खासगी वाहतुकीद्वारे वेगवेगळ्या सेवा देण्यात येत असल्यातरी देखील सुरक्षित आणि कमी दरात सेवा देणार्‍या राज्य महामंडळाच्या एसटी बसलाच सहलीसाठी प्राधान्य दिले जात आहे. शहरातील पिंपरी-चिंचवड आगारामधून डिसेंबर महिन्यातील 17 दिवसांत 17 शाळांच्या सहलींची नोंद करण्यात आली असून 38 एसटी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. यावरून एसटीची क्रेझ अद्यापही जनसामान्यात कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.

आगाराने अटी केल्या शिथिल

बर्याचदा काही जाचक अटींमुळे सहलीसाठी बस बुक करणे अवघड होऊन गेले होते. त्यामुळे काही शाळांना सहलींसाठी विलंब झाला होता. मात्र पिंपरी-चिंचवड आगाराच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांच्या पत्राची अट शिथील केली. परिणामी शाळांना या पत्राची आवश्यकता असली तरी आगाराने शिथीलता केल्याने सहलींची नोंद अधिक झाल्याचे निदर्शनास आल्याचे दिसून येते.

सहलींसाठी शाळांची विशेष पसंती एसटीलाच आहे. त्यामुळे महिनाभरात मोठा प्रतिसाद लाभत आहे. आणखी पुढील दोन महिन्यांत अधिक प्रमाणात बसेसचे बुकिंग होणार आहेत.
-संजय वाळवे, पिंपरी-चिंचवड आगारप्रमुख.

 

कोकणला सर्वाधिक पसंती

शहरातील शालेय सहली या दिवसांत कोकण आणि सातारा दर्शनाला अधिक प्राधान्य देत आहेत. यामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग तर प्रतापगड, पन्हाळागड व महाबळेश्वर या ठिकानांना भेटी दिल्या जात आहेत.

सहलींसाठी दरात सूट

शालेय सहलीसाठी शासन विद्यार्थ्यांना एसटीच्या प्रासंगिक करारावर 50 टक्यांची सवलत देत आहे. त्यामुळे इतर प्रासंगीक करारासाठी 55 रूपये प्रति किलोमीटर तर सहलींसाठी 28 रूपये प्रतिकिलो मीटर दराप्रमाणे वाहतूक करते.

पालकांना नाही चिंता

दर दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि एका बसमधील चाळीस विद्यार्थ्यांमागे चार शिक्षक असल्याने पालकांनाही सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची चिंता आता उरली नाही. त्याकारणाने एसटीला प्राधान्य मिळते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT