पुणे

Lalit Patil Drug Case : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रगतस्कर ललित पाटील प्रकरणात पुणे शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह सहा पोलिस कर्मचार्‍यांना थेट खात्यातून बडतर्फ करण्यात आलंय. खरं तर एखाद्या प्रकरणात एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस बडतर्फ होणं ही गंभीर बाब म्हणावी लागेल. मात्र, असे असताना देखील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका पोलिस उपनिरीक्षकाने थेट अमली पदार्थ विक्री करण्याचं धाडस केलंय. तर दोन पोलिसांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी उकळली. त्यामुळे राज्यभर गाजलेल्या ललित पाटील ड्रग प्रकरणातून पोलिस काय शिकले? हा सवाल कायम आहे.

ड्रगतस्कर ललित पाटील वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. तेथूनच त्याने अमली पदार्थांचा धंदा थाटला. पुढे गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या गेटवर कारवाई करत त्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. दोन दिवसांत ललितने थेट पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातूनच पळ काढला. या प्रकारामुळे पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले. ललितच्या पलायन प्रकरणाच्या चौकशीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेकांचे हात ओले झाल्याचे दिसून आले. तो अनेकदा पोलिसांच्या ताब्यात असताना ससून रुग्णालयातून आलिशान हॉटेलमध्ये आरामासाठी जात होता.

पोलिस आणि ससून रुग्णालयातील काही मंडळी त्याच्यावर ही मेहेरबानी करत होते. त्यांचे बेजबाबदार वर्तन आणि कर्तव्याप्रती असलेला निष्काळजीपणा ललितच्या पथ्यावर पडला. जेवढे पोलिस यामध्ये दोषी असल्याचे आढळून आले तेवढीच ललितप्रती ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची तत्परता दिसून आली. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठातांना टीकेचे धनी व्हावे लागले. अद्यापही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. ड्रगच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर ललितने बाहेर पडण्यासाठी खरी फिल्डिंग लावली ती कारागृहापासून, याच गुन्ह्यात कारागृहातील वैद्यकीय विभागातील कर्मचार्‍याला अटक करण्यात आली तर गार्ड कर्तव्यावरील पोलिस शिपायाला बडतर्फ करण्यात आले. ससूनच्या एका डॉक्टरला देखील अटक झाली.

पुढे ललितला पोलिसांनी पकडले. त्याचा भाऊ, प्रेयसी, मैत्रीण आणि इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली. मात्र, एका महिला अधिकार्‍यासह सहा पोलिसांना ललित प्रकरणात बडतर्फ व्हावे लागले. कोणत्याही बाबींचा विचार न करता तत्कालीन पोलिस आयुक्तांनी दोषी असलेल्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे धाडस दाखविले. गुन्हे शाखेने या रॅकेटची पाळमुळे खोदून काढली. दरम्यान, असे असताना देखील पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाचा ड्रगच्या गुन्ह्यात असलेला सहभाग आणि गांजाच्या खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍यांनी अक्षरशः पोलिस दलाच्या अब्रूची लक्तरे वेशीवरच टांगली.

झटपट श्रीमंत होण्याच्या लोभापोटी

गेल्या काही वर्षांपासून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पोलिसच गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकू लागल्याचे वास्तव आहे. चोरी, दरोडा, खंडणी याचबरोबर आता अमली पदार्थांच्या तस्करीतही पोलिसांचा सहभाग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, फेब्रु  वारी महिन्यात पुणे पोलिस दलातील तीन पोलिसांना खात्यातून बडतर्फ केले आहे. या तिघांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील दिवे गावात कार अडवून एका व्यापार्‍याचे हवाल्याचे 45 लाख रुपये लुटले होते. पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे 'खाकी'कडून 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब—ीदवाक्यालाच हरताळ फासल्याचे पाहावयास मिळत आहे.

एवढे होऊनही पिंपरी-चिंचवडमध्ये तेच घडले

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील उपनिरीक्षकाने नाकाबंदीत
मिळालेल्या अमली पदार्थाची विक्री करून कोट्यधीश होण्याचे
स्वप्न रंगविले. त्यासाठी त्याने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे कृत्य केले. मात्र, पोलिसांना याचा सुगावा लागला अन् 'तो' जाळ्यात अडकला. देशातील तरुण पिढी बरबाद करणार्‍या मेफेड्रॉनसारख्या घातक अमली पदार्थाची तस्करी करण्याचे धाडस केल्याचा आरोप या उपनिरीक्षकावर आहे. त्याच्या या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होण्याचे काम झाले असून, इमानदारीने कर्तव्य निभावणार्‍या पोलिसांना देखील टीकेचे धनी व्हावे लागले आहे. पोलिस दलातील काही कृतघ्न कर्मचार्‍यांमुळे प्रामाणिक पोलिसही यामध्ये विनाकारण भरडले जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT