निरा: निरा (ता. पुरंदर) येथे रविवारी (दि. 31 ऑगस्ट) सायंकाळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आले असताना त्यांच्याविरोधात काही मराठा युवकांनी घोषणाबाजी केली. हाके यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत माझ्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले होते.
गावात आलेल्या नेत्यांना अशी अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल निरेतील ओबीसी समाजातील युवकांनी रविवारी रात्री निषेध व्यक्त करीत बाजारपेठ बंदची हाक दिली. त्यानुसार सोमवारी (दि. 1) निरा बाजारपेठेतील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून ओबीसी समाजाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. (Latest Pune News)
निरा परिसरातील ओबीसी कार्यकर्ते आणि मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक सोमवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्यांचा या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला.
या निषेध सभेत ‘सोमेश्वर’चे माजी उपाध्यक्ष डॉ. वसंतराव दगडे, माजी बांधकाम सभापती दत्तात्रय चव्हाण, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ओबीसी नेते गणेश केसकर, बहुजन समाज पार्टीचे काळुराम चौधरी, गणेश गडदरे, अनिल चव्हाण, राजेंद्र बरकडे, दयानंद चव्हाण, गणेश फरांदे, संदीप धायगुडे, अॅड. आदेश गिरमे, प्रकाश कदम, विजय धायगुडे, गणपत लकडे, शंकरराव मर्दाने आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
या निषेध सभेचे आयोजन महेश धायगुडे, मच्छिंद्र लकडे, निखिल लकडे यांनी केले होते. निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य अनंता शिंदे यांनी आभार मानले.