वेल्हे: पावसाळा तोंडावर येऊनही शासनाकडून निधी न मिळाल्याने खडकवासला साखळीतील पानशेत, वरसगाव खडकवासला धरणांच्या वार्षकि देखभाल दुरुस्तींची कामे ठप्प पडली आहेत. अतिवृष्टी तसेच पुरस्थितीच्या काळात धरणांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्या पुर्वी धरणांच्या सांडव्यावरील मुख्य प्रवेशद्वार, लोखंडी गेट आदींची दुरुस्ती होणे आवश्यक असते. (Latest Pune News)
ब्रिटिश राजवटीत 1879 मध्ये बांधलेल्या खडकवासला धरणाची तसेच स्वातंत्र्या नंतर 1957 मध्ये बांधलेल्या पानशेत व त्यानंतर 1977 मध्ये बांधलेल्या वरसगाव धरणांची दरवर्षी पावसाळ्या पुर्वी एक महिना अगोदरच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येत होते,मात्र यंदा पावसाळा अवघ्या दोन आठवड्या आला असतानाही दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
पुरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच धरणांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्या पुर्वी धरणांच्या स्वयंचलित गेट, दरजांचे ऑईलिंग , प्रमुख भागाची दुरुस्ती रंगरंगोटी आदी कामे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निधी उपलब्ध नसल्याने खडकवासला जलसंपदा विभागाकडून एकाही धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही.दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने सर्व धरणाच्या आवश्यक कामांचा कृती आराखडाही तयार केला आहे.
धरणांच्या वार्षकि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी अद्याप निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळे दुरुस्तीची कामे सुरू केली नाहीत. निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने कामे सुरू केली जाणार आहेत.-मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला