पाटस: कुसेगाव (ता. दौड) गावचे ग्रा्रामदैवत श्री भानोबा देवाच्या यात्रेच्या तयारीला अखेर सुरुवात झाली असून, लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने नियोजनाला प्रारंभ केला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पहिल्या बैठकीत स्वच्छता, बायपास रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व पार्किंग व्यवस्था आणि विद्युतपुरवठा अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून ग्रामस्थांनी स्वच्छेने विविध कामांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या; मात्र, काही प्रमुख कामांचे नियोजन अद्याप बाकी असून, त्यासाठी शनिवारी (दि. २८) पुन्हा बैठक घेऊन उर्वरित जबाबदाऱ्यांचे अंतिम वाटप करण्यात येणार आहे.
यात्रा कालावधीत गावातील नागरिकांसह लाखो भाविकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, तसेच गावातील नेहमीचे बायपास रस्ते स्वच्छ व वाहतुकीसाठी सुस्थितीत राहावेत, यासाठी पाणी व्यवस्था, स्वच्छता आणि रस्ते सुधारणेची महत्त्वपूर्ण जबाबदारी माजी उपसरपंच मनेश शितोळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यात्रेसाठी हजारो वाहनांची ये-जा लक्षात घेता गावाच्या परिसरातील चार ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या दोन दिवसांच्या कालावधीत गावातील सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने माजी सैनिक प्रताप शितोळे व पोलिस पाटील गणेश शितोळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
यात्रा उत्सवाच्या काळात गावात २४ तास अखंडित विद्युतपुरवठा राहावा, यासाठी शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करून आवश्यक कार्यवाही करणे, तसेच गावातील विद्युत कामकाज आणि सुरक्षेची जबाबदारी माजी उपसरपंच विनोद शितोळे यांच्याकडे सोपविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. यात्रेतील कुस्ती आखाड्याच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी विनोद रुपनवर, प्रमोद शितोळे, के. एम. शितोळे, संजय शितोळे आणि दिलीप शितोळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
दरम्यान, यात्रेचे नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यासह पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, महावितरण, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक आणि अन्य आवश्यक सुविधांसाठी शासकीय यंत्रणांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. लोकनाट्य तमाशा, पाळणे, गावातील सर्व मंदिरांची विद्युतरोषणाई, सीसीटीव्ही यंत्रणा आणि आरोग्य सुविधांबाबतचे अंतिम नियोजन शनिवारच्या बैठकीत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
ग्रामदैवत श्री भानोबा देवाची यात्रा हा कुसेगावच्या धार्मिक परंपरेबरोबरच ग्रामस्थांच्या एकजुटीचा उत्सव मानला जातो. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी कोणतीही एक व्यक्ती किंवा संस्था नव्हे, तर संपूर्ण गाव एकत्र येऊन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वेच्छेने कामांची जबाबदारी स्वीकारत आहे. लाखो भाविकांचे स्वागत आणि त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामस्थांनी आतापासूनच कंबर कसली आहे. या बैठकीला ज्येष्ठ नागरिक विजयसिंह शितोळे, दादा शितोळे, मधूनाना शितोळे, उद्योजक मोहन शितोळे, विजय पांडुरंग शितोळे, भाऊसाहेब शितोळे, दत्ता भोसले, परशुराम भोसले, धीरज शितोळे, उत्तम रूपनवर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.