Kurkumbh MIDC Toxic Liquor Factory Pudhari
पुणे

Kurkumbh MIDC Lab Case: कुरकुंभ एमआयडीसीतील समर्थ लॅब प्रकरणानंतर तपासणी यंत्रणांवर प्रश्नचिन्ह; उद्योगांच्या ऑडिटची मागणी

शेकडो उद्योगांची नियमित तपासणी होते का? परवाने, रासायनिक साठे आणि सुरक्षेच्या नियमांबाबत पारदर्शकतेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

विनोद गायकवाड

पांढरेवाडी: कुरकुंभ एमआयडीसीतील समर्थ लॅब प्रकरणानंतर औद्योगिक क्षेत्रातील तपासणी यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या आणि साधारणपणे १०० पेक्षा जास्त उद्योग कार्यरत असलेल्या या औद्योगिक वसाहतीत संबंधित विभागांकडून नियमित तपासण्या होत असतील, तर बेकायदेशीर कारवाया उघडकीस येण्यासाठी इतका कालावधी का लागला? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कुरकुंभ एमआयडीसीतील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक निरीक्षक कार्यालय, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अग्निशमन विभाग, एमआयडीसी प्रशासन, अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन, पोलिस यांच्याकडून वेळोवेळी तपासण्या होणे अपेक्षित आहे.

उद्योगांचे परवाने, उत्पादन प्रक्रिया, रासायनिक साठा, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा, कामगारांची सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांची पडताळणी करणे या विभागांची जबाबदारी आहे. मागील गेल्या काही वर्षांत कुरकुंभ एमआयडीसीतील किती उद्योगांची तपासणी करण्यात आली? किती उद्योगांना नियमभंगाबाबत नोटिसा बजाविण्यात आल्या? त्यापैकी किती उद्योगांवर प्रत्यक्ष कारवाई झाली? किती उद्योगांचे परवाने निलंबित करण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेली नाहीत.

उद्योगांची तपासणी केवळ कागदपत्रांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष उत्पादन विभाग, गोदामे, रासायनिक साठे आणि नोंदवही यांची पडताळणी होणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांचे डिजिटल ऑडिट, सीसीटीव्ही पडताळणी आणि नियमित नमुना तपासणी करण्यात आली, तर गैरप्रकारांना आळा बसू शकतो. दरम्यान, समर्थ लॅब प्रकरणानंतर कुरकुंभ एमआयडीसीतील इतर उद्योगांचीही व्यापक तपासणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

कुरकुंभ एमआयडीसी ही राज्याच्या औद्योगिक विकासाची महत्त्वाची ओळख आहे. मात्र, काही गैरप्रकारांमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्राची प्रतिमा मलिन होत असेल तर त्यासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारला जात आहे. औद्योगिक क्षेत्रात नेमके कोणते उत्पादन सुरू आहे? रसायनांचा वापर कशासाठी केला जातो? आणि त्याचा परिसरातील पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? याबाबत पारदर्शक माहिती देणे गरजेचे आहे.
राहुल भोसले, पंचायत समिती सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT