दुरुस्तीनंतर भाविकांसाठी खुला झालेला पूल. Pudhari
पुणे

Kund Hanging Bridge:कुंड पर्यटनस्थळी झुलता पूल अखेर सुरु; बांधकाम विभागाची स्ट्रक्चरल ऑडिटला टाळाटाळ

ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती; भाविक व पर्यटकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील कुंड पर्यटनस्थळावरील झुलता पूल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सुरू करण्यात आला आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा पूल सुरू झाल्याने स्थानिकांसह भाविक, पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.(Latest Pune News)

या पुलाची जुलै महिन्यात अवस्था धोकादायक झाल्याने तो वापरासाठी बंद करण्यात आला होता. मात्र, बांधकाम विभागाकडून वेळेत दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने भाविक व पर्यटकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.

कुकडी नदीवरील रांजणखळगे, मळगंगादेवीचे मंदिर आणि रमणीय परिसरामुळे कुंड हे पुणे-नगर सीमेवरील प्रमुख धार्मिक व पर्यटन केंद्र आहे. वर्षभर येथे भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी असते. नदीच्या दोन्ही बाजूस मळगंगादेवीची मंदिरे आहेत. येथे या झुलत्या पुलाद्वारे ये-जा करणे सुलभ होते. मात्र, पूल बंद झाल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेष म्हणजे, नवरात्र महोत्सव जवळ आल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात ठोस भूमिका दिसून आली नाही. सततच्या पाठपुराव्यानंतरही निर्णय न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. शेवटी पुलाचे बांधकाम केलेल्या ठेकेदाराने पुलाची पाहणी केली तसेच ग्रामपंचायतीस पत्राद्वारे पूल दुरुस्ती करून वापरासाठी योग्य असल्याचे कळविले. यानंतर ग्रामपंचायतीने स्वतःच्या पुढाकाराने वेल्डिंगचे काम पूर्ण करून पूल भाविकांसाठी खुला केला. यामुळे नवरात्रीत होणारी गैरसोय टळली आहे.

पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटसंदर्भात वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात कार्यवाही होईल, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शिरूर शाखा अभियंता अनिल गावडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT