पुणे: कोविडच्या काळात घरोघर डबे पोहोचवून गरजवंत नागरिकांना केलेली मदत आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी केलेले काम पाहून पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली. येत्या पाच वर्षांत कोथरूडमधील वाहतूकसमस्येवर प्रभावी उपाययोजना करून डेक्कन- हॅपी कॉलनी प्रभागाचा (प्रभाग- 29) समावेश शहरातील स्वच्छ व चकाचक प्रभाग करण्याचा निर्धार या प्रभागातील नवनिर्वाचित सदस्य पुनीत जोशी यांनी व्यक्त केला.
’दै. पुढारी’ कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलताना प्रभागातील विविध समस्या व त्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत जोशी यांनी सविस्तर माहिती दिली. कोथरूडच्या या प्रभागात सध्या कचऱ्याची गंभीर समस्या दिसत असून, कचरा वेचक संस्था आणि तो वाहून नेणारी महापालिकेची वाहतूक व्यवस्था यांच्यातील समन्वयाच्या अभावाने ती निर्माण झाली आहे. कचरा वेचक महत्त्वाच्या चौकालगत कचऱ्याचे विलगीकरण करून वाहनाची वाट पाहत थांबतात आणि ते वेळेवर न आल्यास पदपथावर ठेवलेला हा कचरा सर्वत्र पसरतो, असे आढळून आले आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी वेळेत कचरा वाहून नेणारी 10 नवीन वाहने प्रभागात लवकरच उपलब्ध केली जाणार आहेत. आयुक्तांनी तसे आश्वासन नुकतेच दिले आहे. विद्यार्थिदशेपासून आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यात सहभागी झालो होतो. श्यामराव कलमाडी कॉलेजला शिकताना युवा मोर्चाच्या विद्यार्थी आघाडीचा प्रमुख म्हणून पहिली विद्यार्थी शाखा उघडण्याचे काम केले होते. त्या पाठोपाठ भाजयुमोचा पुणे शहर महामंत्री, कोथरूड मतदारसंघाचा बूथ विस्तारक, कोथरूड विधानसभा अध्यक्ष असा आपला राजकीय प्रवास झाला.
स्व. गिरीश बापट यांनी काढलेल्या रॅलीत 22 दिवस त्यांच्याबरोबर काम केले. विकास मठकरी यांच्या विधानसभा निवडणुकीची, तसेच गिरीश बापट यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारीही आपल्यावर सोपविली गेली होती. त्यामुळे भाजप संघटनाबरोबर पुणेकर मतदारांपर्यंत घराघरांत पोहोचता आले, असेही ते म्हणाले. महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी कधीही कोणाकडे हट्ट धरला नव्हता, असे सांगून जोशी म्हणाले, की प्रभागात काही बदल करण्याच्या उद्देशाने मला आदेश दिल्याने ही निवडणूक लढविली.
ही कामे करणार
कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट बंद करून कचरा विलगीकरणाचे काम अन्यत्र हलविणार
मिसिंग लिंक जोडण्यावर भर
दशभुजा गणपती, कर्वे पुतळा चौकातील कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पूल किंवा समतल विलगकाची योजना करणार
शिवणे ते खराडी नदीकाठचा रस्ता पूर्ण करण्यास प्राधान्य
पीएमटीच्या मदतीने मेट्रोपर्यंतची कनेक्टिव्हिटी वाढवणार
प्रभागातील डुकरांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी प्रयत्न करणार