पुणेः भाजपने कोथरूडच्या प्रभाग 29 मध्ये (डेक्कन-हॅपी कॉलनी) तब्बत तीन विद्यमानांना डच्चू दिला असून, धडाडीच्या नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. वगळण्यात आलेले विद्यमानही कार्यक्षम, पक्षनिष्ठ व धडाडीने काम करणारे म्हणून परिचित होते. तरीही त्यांना डावलण्यात आल्याने ते राजकीय द्वद्वांचे बळी ठरल्याच्या चर्चांना कोथरूडमध्ये पेव फुटले आहे.
नव्याने उमेदवारी दिलेल्या सुनील पांडे यांना काल दुपारनंतर होल्डवर ठेवण्यात आल्याने, तर रात्री उशिरापर्यंत या उमेदवारीबाबत तळ्यात-मळ्यात सुरू होते. परिणामी पांडे यांच्याबरोबरच स्पर्धेत असलेल्या इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली होती. मात्र, मंगळवारी (दि. 30) सकाळी उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याने पांडे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या प्रभागातील माजी नगरसेवक जयंत भावे हे खासदार मेधा कुलकर्णी यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित आहेत, तर दीपक पोटे हे चंद्रकांत पाटील यांचे पाठीराखे आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात पोटे आघाडीवर होते. त्यामुळे साहजिकच या दोन्ही नेत्यांनी आपल्या या निष्ठावान नगरसेवकांसाठी आग््राहाची भूमिका घेतली होती. त्यावरून बरीच खडाजंगीही झाली. परंतु भावे यांना बदलण्याचा निर्णय झाल्याने इतर जागांच्या बदलाबाबतही आग््राह धरण्यात आला. परिणामी, पोटे यांच्या जागीही नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा मुद्दा पुढे आला आणि तेथे सुनील पांडे यांची वर्णी लागली, तर माधुरी सहस्रबुद्धे यांच्या जागी मिताली सावळेकर यांना संधी मिळाली.
सुनील पांडे यांच्याप्रमाणेच भाजपचे जुनेजाणते कार्यकर्ते प्रशांत हरसुले आणि मनसेतून भाजपात दाखल होऊन दादा व अण्णांचे निकटवर्ती झालेले मंदार बलकवडे हेही इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या या जागेसाठी इच्छुक होते. या तिघांच्या स्पर्धेत सुनील पांडे यांची सरशी झाली. डेक्कन-हॅप्पी कॉलनी असे नाव असलेल्या या प्रभागात उमेदवारी मिळालेले तीनही उमेदवार कर्वेनगर व कोथरूडचे रहिवासी आहेत. या प्रभागात डेक्कन परिसराचा समावेश असल्याने डेक्कनला प्रतिनिधित्व देण्याच्या विचारातून पांडे यांची निवड केली गेली असावी, असे सांगितले जाते. पण त्यांच्यासाठी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आग््राही होते, अशी चर्चा आहे.
पांडे यांना काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निरोप मिळाला, पण नंतर लगेच राजकीय हालचालींना वेग आला. इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे पुन्हा एकदा जोरदार फिल्डिंग लावली. त्यामुळे या उमेदवारीबाबत पुन्हा खलबते सुरू झाली. चंद्रकांत पाटील यांनी दीपक पोटे, तर सिद्धार्थ शिरोळे यांनी सुनील पांडे यांच्या नावासाठी आग््राही भूमिका घेतली. एका बड्या नेत्याचा पोटे यांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे या जागेचा निर्णय मध्यरात्रीपर्यंत होल्डवर ठेवण्यात आला होता. उमेदवारनिवडीची जबाबदारी असलेल्या नेत्यांनीही याप्रकरणी न्यूट्रल भूमिका घेऊन या निर्णयाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात ढकलला. अखेर आज सकाळी श्रेष्ठींनी सुनील पांडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.