मेट्रो डेपोच्या विस्तारासाठी कोथरूड कचरा रॅम्प होणार बंद; महापालिका आयुक्तांचे आदेश Pudhari
पुणे

मेट्रो डेपोच्या विस्तारासाठी कोथरूड कचरा रॅम्प होणार बंद; महापालिका आयुक्तांचे आदेश

घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांची कोंडी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मेट्रोच्या विस्तारासाठी कोथरूड येथील कचरा संकलन रॅम्प बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. हे केंद्र सोमवारपासून (दि. 28) बंद करण्यात आले असून, यामुळे या परिसरातील कचरा गोळा करून त्याचे विलगीकरण कोठे करणार, असा प्रश्न पालिकेच्या घनकचरा विभागाला पडला आहे.

महामेट्रोच्या वनाज डेपोसाठी या पूर्वी कचरा रॅम्पची तब्बल 30 गुंठ्यांपेक्षा जास्त जागा ही देण्यात आली आहे. आता या जागेसाठीदेखील मेट्रोने पालिकेकडे जागा देण्याचा तगादा लावण्याने पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश दिले आहेत.

महामेट्रोला डेपो उभारता यावा, यासाठी पालिकेने कोथरूड येथील कचरा डेपोची जागा महामेट्रोला दिली आहे. त्यामुळे येथील कचरा डेपो हा देवाची उरुळी, फुरसुंगी येथे हलवण्यात आला आहे.

येथील कचरा डेपो बंद झाल्यावर महापालिकेने येथील 30 गुंठे जागेवर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत गोळा होणारा ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी कचरा गोळा केंद्र (रॅम्प) तयार केले होते. वारजे आणि कर्वेनगर परिसरातील कचरा हा छोट्या-मोठ्या घंटागाड्यांच्या माध्यमातून गोळा करून येथे विलगीकरणासाठी आणला जात होता. तब्बल 185 टन कचरा येथे रोज गोळा होत होता.

सुका आणि ओला कचरा वेगळा करून त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी तो प्रक्रिया केंद्रावर पाठवला जात होता. मेट्रोच्या विकास आराखड्यात कचरा डेपोची सर्व जागा महामेट्रोला देण्यात आली आहे. मेट्रोचा डेपो झाल्यावर येथे रस्त्यालगतच्या जागेवर कचरा विलगीकरून केंद्र सुरू होते. मात्र, हे केंद्र हटवण्यात यावे, यासाठी महामेट्रोने महापालिकेकडे तगादा लावत सातत्याने पाठपुरावा केला होता.

येथील कचरा विलगीकरण केंद्र हे पालिकेने बावधन येथील चाळीस गुंठे जागेत तयार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही जागा एनडीए विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असून, विलगीकरण केंद्राचे शेड उभारण्यासाठी डिफेन्सची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी महापालिकेने अर्जदेखील केला आहे. ही परवानगी मिळाल्याशिवाय पालिकेला या ठिकाणी बांधकाम करता येणार नसून, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी येथील कचरा विलगीकरण केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

कचरा विलगीकरणासाठी ‘जागा देता का जागा’?

पुणेकरांच्या कचर्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फेकून दिला जातो. त्यामुळे वारजे येथील दवाखान्यासाठी जसे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, उच्च व शिक्षणमंत्र्यांनी मोठे प्रयत्न करून डिफेन्सची परवानगी मिळविली, तशीच परवानगी ही नेते मंडळी बावधन कचरा केंद्रासाठी मिळवणार का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

कोथरूडचा कचरा औंध, घोले रोड केंद्रावर नेणार!

महापालिकेने दिलेल्या या आदेशामुळे घनकचरा विभागातील अधिकार्‍यांची कोंडी झाली आहे. येथील कचरा हा तातडीने घोले रोड क्षेत्रीय कार्यालय व औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या रॅम्पवर हलविण्यात येईल का, यासाठी चाचपणी सुरू आहे. या दोन्ही कचरा विलगीकरण केंद्रावर मोठा ताण असून, कोथरूड, वारजेमधील कचरा या दोन केंद्रांवर आणण्यासाठी पालिकेला मोठा खर्च करावा लागणार आहे. यामुळे या दोन्ही केंद्रांवर कचर्‍याचा ताण वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT