धावपट्टी विस्तारीकरणासाठी हवी 200 एकर जागा; मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे: लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी 200 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यातील 25 एकर जमीन संरक्षण विभागाकडून घेण्यात येणार असून, 65 एकर खासगी जागेचे हस्तांतरण करणार आहे. उर्वरित आवश्यक जागेसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली.
लोहगाव येथील नव्या विमानतळ टर्मिनलवर केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘उड्डाण यात्री कॅफे’चे उद्घाटन झाले. त्यानंतर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी आमदार बापू पठारे आणि आयआरपीएस सदस्य डॉ. एच. श्रीनिवास, पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके उपस्थित होते. विस्तारीकरणासाठी उपलब्ध असलेली संरक्षण विभागाची 25 एकर जागा मिळावी, अशी मागणी केली आहे. त्या बदल्यात संरक्षण विभागाला दुसरीकडे जागा दिली जाणार आहे. या मागणीला संरक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पाणीबाटली 10 रुपयांत, तर वडापाव 20 रुपयांत
उड्डाण यात्री कॅफेमध्ये विमानतळावर पिण्याचे पाणी, चहा, कॉफी, वडापाव स्वस्तात मिळणार आहे. त्यामध्ये वडापाव 20 रुपये, पाणी बॉटल 10 रुपये, चहा 10 रुपयांत मिळणार असून, हा कॅफे 24 तास खुला राहणार आहे.
विमानोड्डाणात 60 टक्क्यांनी वाढ
सध्या पुणे विमानतळावरून वर्षाकाठी दहा लाख प्रवासी विमानप्रवास करतात. नव्या विमानतळावर 34 तपासणी केंद्रे असून, डीजी यात्रासारखी स्वयंतपासणी व्यवस्था आहे. दोन्ही टर्मिनलवरून हवाई प्रवास करणार्यांमध्ये 14 ते 15 लाखांची वाढ होणार आहे. शिवाय विमानोड्डाणात 60 टक्क्यांनी आणि कार्गो सेवेत 8.85 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
‘उड्डाण यात्री कॅफे’मुळे प्रवाशांची विमानतळावर किफायतशीर दरात पाणी व खाद्यपेय मिळण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे. विमानतळ प्रशासनाने येथे मिळणार्या खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राखला जाईल, याविषयी काळजी घ्यावी.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ
